पुणे/प्रतिनिधी ः माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक व कामगारांत दहशत माजवून आर्थिक लुटमार करणार्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
पुणे/प्रतिनिधी ः माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक व कामगारांत दहशत माजवून आर्थिक लुटमार करणार्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय-30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकातील स्टार बाझारपुढे 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रविंद्र वाडीया (वय-24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांचे मालकीचे रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल अॅक्टिव्हिटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढर्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन जण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकार्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे काय ठेवले? काम कसे काय करत आहात? असे बोलून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, तोंडाला , पोटाला, कंबरेला व पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी त्याची वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वरिेष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी आरोपी वेगवेगळे पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. त्यानुसार सदर आरोपींना वाशी, नवी मुंबई येथे जावून सापळा रचून अटक केली. चौकशीत जोगदंडने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याच्या सहकार्यांनाही अटक करण्यात आली. आरोपी रमाकांत जोगदंड (वय-30) हा सराईत गुन्हेगार असून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे. दुसरीकडे, गत 4 जुलै रोजी माथाडी संघटनेचा सचिव सुरेश बनसोडे (वय-37,रा.रहाटणी,पुणे) याने काळेवाडी परिसरात ज्योतीबानगर येथे 3 ट्रक चालकांकडे प्रत्येकी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच दहडपशाही करुन ट्रकच्या आरशाचा काचा फोडून नुकसानही केले. याप्रकरणी सागर मारनुर (वय-25,रा.अभिसेवाडी, ता. सांगोला, सोलापूर) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. माथाडी संघटनेच्या नावाखाली कुणी खंडणी मागितली तर तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी केले आहे.
COMMENTS