महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार ट

महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा आपला पावित्रा कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे सत्ताधार्यांनी विरोधकांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबतच अधिवेशनात विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होताच राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणातून ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेचा स्पष्ट आणि ठोस रोडमॅप समोर आला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचा संदर्भ देत राज्याच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा निश्चित करण्यात आली. हे अभिभाषण केवळ आकडेवारी मांडणारे नव्हते, तर आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधणार्या विकासाचे दृष्टीपत्र होते, त्याबद्दल कौतुक असले तरी, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. महाराष्ट्र देशातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणारे अग्रगण्य राज्य ठरले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यात 16 लाख कोटी रुपयांची एफडीआय आली असून ती देशातील एकूण गुंतवणुकीच्या 39 टक्के आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा 13 ते 13.5 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही आकडेवारी केवळ आर्थिक यशाचे प्रतीक नाही, तर राज्यातील औद्योगिक स्थैर्य, धोरणात्मक सुसंगती आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवते. जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 18 देशांतील कंपन्यांसोबत जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. या करारांमुळे सुमारे 40 लाख रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. ही केवळ कागदोपत्री गुंतवणूक न राहता ती प्रत्यक्षात उद्योगरूपाने उभी राहिली, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व गती मिळेल. मात्र, या गुंतवणुकींची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि वेळेत प्रकल्प पूर्ण होणे हे तितकेच महत्त्वाचे ठरेल.
2026 ते 2030 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेले नवीन उद्योग व सेवा धोरण हे भविष्योन्मुख आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांना चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात उत्पादनक्षमता वाढवणे, हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक कौशल्यविकास यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. रोजगारनिर्मिती हा या धोरणाचा केंद्रबिंदू असल्याने युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांच्या विकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाढवणपर्यंत विस्तारण्याचा निर्णय राज्यातील दळणवळण अधिक सक्षम करेल. हा महामार्ग केवळ प्रवास सुलभ करणार नाही, तर औद्योगिक गुंतवणूक आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसही चालना देईल. ग्रामीण संपर्क सुधारण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण भागातील रस्ते, बाजारपेठांशी जोडणी आणि पायाभूत सुविधा सुधारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. विशेषतः विदर्भ आणि गडचिरोलीसारख्या मागास भागांवर लक्ष केंद्रित करणे ही स्वागतार्ह बाब आहे. नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या गडचिरोली जिल्ह्याचे रूपांतर स्टील हबमध्ये करण्याची योजना ही परिवर्तनाची नांदी ठरू शकते. विदर्भात स्टील कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय औद्योगिक विकासाला नवी दिशा देईल. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार, पूरक उद्योगांची वाढ आणि प्रादेशिक विषमता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि स्थानिक लोकांच्या हितांचे संरक्षण करणे हेही तितकेच आवश्यक आहे. विकसित महाराष्ट्राची संकल्पना केवळ औद्योगिक वाढीपुरती मर्यादित नसून सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकास यांनाही समान प्राधान्य देणारी असली पाहिजे. आर्थिक वाढीचे फळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ग्रामीण-शहरी दरी कमी करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करणे आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही शासनाची जबाबदारी आहे. राज्यपालांच्या अभिभाषणातून आत्मविश्वास आणि आशावाद दिसून येतो. मात्र, घोषणांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास कठीण असतो. प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन, पर्यावरणीय परवानग्या, वित्तपुरवठा आणि प्रशासकीय समन्वय यांची पूर्तता वेळेत झाली तरच हे स्वप्न साकार होईल. तसेच, भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार हे यशाचे मुख्य सूत्र ठरेल. आज महाराष्ट्रासमोर मोठी संधी उभी आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूक आकर्षित करताना स्थानिक गरजा आणि पर्यावरणीय संतुलन यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ ही केवळ घोषवाक्य नसून ती एक सामूहिक जबाबदारी आहे. शासन, उद्योग, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच हे ध्येय साध्य होईल. राज्यपालांच्या अभिभाषणाने विकासाचा व्यापक आराखडा समोर ठेवला आहे. आता अपेक्षा आहे ती ठोस कृतीची. 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार, 40 लाख रोजगारनिर्मितीची शक्यता, विदर्भातील स्टील कॉरिडॉर, गडचिरोली स्टील हब, समृद्धी महामार्गाचा विस्तार – हे सर्व उपक्रम यशस्वी झाले, तर महाराष्ट्र देशाच्या विकासाचा खरा इंजिन ठरेल. विकसित, समृद्ध आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच आशादायी आहे.

COMMENTS