पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराडच्या श्री येडोबा देवाची दि. 12 पासून यात्रा सुरू होत आहे

पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराडच्या श्री येडोबा देवाची दि. 12 पासून यात्रा सुरू होत आहे. यात्रा काळातील लाखो भाविकांची उपस्थिती पाहता यात्रेत कोणताही अडथळा निर्माण होवू नये यासाठी बनपेठ (येराड) परिसरातील रूंदीकरणाचे काम ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित ठेकेदाराने काम तातडीने हाती घेतल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे ग्रामस्थांसह भाविकभक्तांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या गुहागर-विजापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम बनपेठ (येराड), ता. पाटण गावच्या हद्दीपर्यंत आले आहे. यात्रा काळात हे रूंदीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेंजर यांना ग्रामस्थांनी दि. 12 एप्रिल पासूनच्या येडोबा यात्रेची वारंवार माहिती दिली होती. तरीही येथील काम ठप्प झाले होते. नळपाणी पुरवठा योजनेचे लीकेजही तशीच ठेवण्यात आली होती. यात्रा काळात अशीच स्थिती राहिल्यास संथगतीने सुरू असलेली वाहतूक, प्रवाशी थांब्यावर वाहन थांबल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाहन पार्किंगचाही मोठा प्रश्न निर्माण होणार होता. याशिवाय नळ पाणी गळती न काढल्यास ऐन यात्रेत यात्रेकरूसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार होती. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराड, ता. पाटण येथील येडोबा देवाच्या पाच दिवस चालणार्या या यात्रेसाठी सुमारे लाखभर भाविक ये-जा करत असतात. या रस्त्याच्या अपुर्या कामामुळे भाविकभक्तांची अडचण निर्माण होवू नये यासाठी पाटणच्या प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून यात्रेच्यापूर्वी बनपेठ (येराड) परिसरातील रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांसह भाविकांनी करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. याबाबतची दखल घेत पाटणच्या प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने बनपेठ (येराड) परिसरातील रूंदीकरणाचे काम तातडीने मार्गी लावले आहे.
COMMENTS