पाटण / प्रतिनिधी : बौध्द पौर्णिमेनिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या वन्यजीव गणनेत एका बिबट्य
पाटण / प्रतिनिधी : बौध्द पौर्णिमेनिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या वन्यजीव गणनेत एका बिबट्यासह 308 श्वापदांची नोंद झाली. व्याघ्र प्रकल्पात केवळ एकच बिबट्या आढळला. मागील वर्षी कोरोनामुळे प्राणीगणना करण्यात आली नव्हती.
दर वर्षी बौध्द पौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आली नव्हती. प्राणी गणना प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्पात होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बुध्द पौर्णिमेला वन्य प्राणी गणना करू नका, अशा सूचना वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर दिल्या होत्या. त्यामुळे वन्य प्राणी गणना करण्यात आली नव्हती. त्यापूर्वी 2020 मधील बुध्द पौर्णिमेला प्राणी गणना झाली होती. त्या वेळी वन विभागांतर्गत उपक्रम राबवला होता. कॅमेरा ट्रॅपिंग आणि अन्य तंत्रज्ञानाने वन्यजीव गणना झाली होती. त्यात लोकसहभाग वाढवला होता. याही वर्षी तसा सहभाग होता. वन्य प्राण्यांसह जंगल व वन्य प्राण्यांविषयी जागरूकता व्हावी, यासाठी वन्यजीव गणनेत लोकसहभाग वाढवला जातो.
व्याघ्र प्रकल्पात उदमांजरसह राज्य प्राणी शेकरू, मोर, अस्वल यांच्या अस्तित्वाची नोंद झाली. प्रतिवर्षी व्याघ्र प्रकल्पात 16 मे रोजी बौध्द पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना होते. व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी, हेळवाक, चांदोली, कोयना, बामणोली या पाच वनपरिक्षेत्रात एकूण 54 मचाणांवर निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना झाली. या वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह 15 वन्य प्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले. 54 प्रगणकांकडून भरून घेतलेल्या अभिप्रायानुसार रात्री पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी 308 प्राणी आल्याची नोंद घेण्यात आली. त्यात बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्वल, वानर, सायाळ, मुंगूस, मोर, रानकोंबडी, शेकरूसह उदमांजराचा समावेश आहे. त्याच्या निरिक्षणाच्या नोंदी वन्यजीव विभागाकडे आहेत. त्याबाबत जागरूकताही हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वन्य प्राणी गणनेत आढळलेले प्राणी बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्वल, वानर, सायाळ, मुंगूस, मोर, रानकोंबडी, शेकरू, उदमांजर.
COMMENTS