साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, विचारवंत, समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी रामाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक नवे विधान केले आहे. या विध
साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, विचारवंत, समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी रामाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक नवे विधान केले आहे. या विधानातून त्यांनी तीनशे प्रकारची रामायण उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रत्येक रामायणात वेगवेगळी वर्णन येतात. त्यानुसार वाल्मिकी हा शृंग घराण्याचा कवी असल्यामुळे, शृंग घराण्याला वाटत असणाऱ्या पद्धतीने वाल्मिकीने रामायण लिहिल्याचे भालचंद्र नेमाडे म्हणतात. अर्थात २२ जानेवारीला अयोध्येत होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने देशभरातील विचारवंत, लेखक, समीक्षक, तत्त्वज्ञ, इतिहाससज्ञ, राजकीय क्षेत्रातील तज्ञ आणि प्रत्यक्षात राजकीय नेते, सामाजिक संघटना या सगळ्या क्षेत्राकडून आपली मते व्यक्त होत आहेत. या सगळ्यांच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या रामात वेगवेगळा राम आहे. एकंदरीत भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने जर विचार केला, तर, कोणतेही महाकाव्य हे केवळ काल्पनिक राहत नाही. महाकाव्यात येणाऱ्या बाबी या समाज व्यवस्थेमध्ये कधी ना कधी संस्कृती म्हणून राहिलेल्या असतात. काव्य आणि साहित्य निर्माण करणारे हे त्या समाज व्यवस्थेच्या धारणांना किंवा मान्यतांना आपल्या अनुभवाचाही एक भाग बनवतात. प्रत्यक्ष लेखनातून तो अभिव्यक्त करतात. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी “कोसला’ या कादंबरीतून लेखक म्हणून साहित्याच्या परंपरांना मोडीत काढले होते. त्यामुळे ते एक बंडखोर साहित्यिक आहेत. पण, अतिशय दीर्घ काळानंतर त्यांनी हिंदू ही कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरी मध्ये त्यांनी, त्यांना वाटणारी मतं हिंदू जीवनपद्धती एक समृद्ध अडगळ अशा पद्धतीने लिहिली. यात येणार त्यांचं लेखन हे समाजाच्या सांस्कृतिक निरीक्षणातून आलेले दिसते. तसंच वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण हे देखील त्यांनी समाजातल्या निरीक्षणातून आणि अनुभवातून मांडलेले असावे. तसं पाहिलं तर राम-रावण युद्ध हे राज्यसत्तेसाठी किंवा धार्मिक सत्तेसाठी असणार युद्ध म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर, ते इतिहासावर देखील अन्याय करणार राहिल! रावणाला ब्रह्मन म्हटलं जात असे. ब्रम्हन याचा अर्थ स्त्रीसत्ताक राज्यपद्धतीला मान्यता देणारा. याउलट रामाच्याकरवी या देशात आर्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नातून त्यांनी क्षत्रिय रामाला आपला नायक निवडला. राम आणि रावण या युद्धाचा एक भाग असा आहे की, रावणाला जितके जास्त डिवचले जाईल किंवा चिडवता येईल, त्याला युद्धासाठी रणांगणावर आणता येईल तेवढी भूमिका, राम आणि लक्ष्मण यांच्याकडून वठवण्यात आली. शृपनखा आणि ताटिका या दोन्ही राण्या होत्या. त्यांना ज्या पद्धतीने विद्रूप करण्यात आलं त्यातून रावणाला देखील चीड आली. राम-रावण हे युद्ध उभं राहिलं. दहा दिवसाच हे युद्ध, राजकीय किंवा केवळ सत्तेचे युद्ध नव्हतं, तर, प्रचलित व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी ते युद्ध लढले गेलं. रावण हा स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या बाजूने लढला. रामाला आर्यांनी पुरुष सत्ताकव्यवस्थेच्या बाजूने लढायला भाग पाडलं. मग या युद्धात रामाचा विजय झाला. पर्यायाने पुरुषसत्ताक व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त झाला. भालचंद्र नेमाडे हे पुरोगामी व्यवस्थेचे लेखक किंवा विचारवंत मानले जातात. पुरोगामी विचारवं व्यवस्थेमध्ये आज स्त्रीसत्ताक राज्यव्यवस्था निर्माण व्हावी असं प्रत्यक्ष व्यवहारात किती विचारवंतांना वाटतं, हे देखील एकदा समाजासमोर यायला हवं! किंबहुना, एका बाजूला समतावादी विचार मांडण्याचे साहस करायचं आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीसत्ताक व्यवस्था येऊ नये, यासाठीही सज्ज राहायचं, अशा दुटप्पींनी आपली भूमिका खरे तर सांस्कृतिक दृष्ट्या स्पष्ट करायला हवी. त्यामुळे रामाच्या विजयातून प्रशस्त झालेली पुरुषसत्ताक व्यवस्था ही छुपी परिवर्तनवादी असणाऱ्यांनाही मान्यच असावी. किंबहुना, त्याच व्यवस्थेचे ते पाईक असावेत, असे वाटल्या वाचून राहत नाही. रामाच्या संदर्भात व्यक्त होणारे पुरोगामी किंवा परिवर्तनवादींनी हे देखील स्पष्ट करावं की, आपण पुरुषसत्ताक आणि स्त्रीसत्ता या व्यवस्था यामध्ये केवळ भाषणापुरतं स्त्रीसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करतो की, त्याला व्यवहारात आणण्यासाठीही आपण तत्पर असतो, यावर देखील एकदा त्यांनी आपली विचारांची स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. राम हा महाकाव्याचा विषय असू शकला किंवा इतिहासाचा विषय असू शकला तरीही, रामाच्या राज्यानंतर जी व्यवस्था उभी राहिली ती, स्त्रीसत्ताक व्यवस्था जाऊन पुरुषसत्ताक व्यवस्था उभी राहिली. त्या व्यवस्थेला पाठबळ आपल्या घरापासून आपण देऊन इच्छितो का आणि तसे जर असेल तर पुरोगामी व्यवस्थेतून देखील सभामंचापासून तर भाषणांपर्यंत पुरुषच का चमकतात, याचे एकदा त्यांनी उत्तर द्यावं. ही या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.
COMMENTS