Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा  

पोलिसांच्या 9 गाडयांसह 20 गाडयांची जाळपोळ

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात श्रीराम नवमीचा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा करण्यात येत असतांना, छत्रपती संभाजीनगर शहरातील किर्‍हाडपुरा भागात गुरू

खैरेंनी आता मनपाचीही तयारी करावी : शिरसाट
समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
 समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात श्रीराम नवमीचा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा करण्यात येत असतांना, छत्रपती संभाजीनगर शहरातील किर्‍हाडपुरा भागात गुरूवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पोलिसांच्या 9 वाहनांसह 20 गाडयांची जाळपोळ केली. किर्‍हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी साजरा होणार्‍या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुर्‍यातदेखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट परिसरातील धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक परिसरातील मंदिरात घुसले. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली. परिसरातील पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडत जमावावर नियंत्रण मिळवले.

शांंतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये राडा झाल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे शांतता पाळा आणि तुमच्याकडे येणार्‍या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचे सत्य पडताळल्याशिवाय विश्‍वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.खासदार इम्तियाज जलील, मंत्री अतुल सावे, प्रदीप जयस्वाल आणि पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.  

भाजप आणि एमआयएमची मिलीभगत ः खैरेंचा आरोप – छत्रपती संभाजीनगरची दंगल म्हणजे भाजप आणि एमआयएमची मिलीभगत आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यामागचे मास्टरमाइंड आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीची 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आहे. ती त्यांना सुरळीत होऊ द्यायची नाही. शिवसेनेला डॉमिनेट करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, असा आरोप खैरे यांनी केला.

वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न ः उपमुख्यमंत्री फडणवीस- छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मध्यरात्री झालेली घटना दुर्दैवी आहे. शहरात आता शांतता आहे. मात्र, काही नेते भडकवणारी वक्तव्य करुन वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरे तर अशा तणावपूर्ण स्थितीत कसे वागावे हे नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. अशा कोणीही परिस्थितीत चुकीची वक्तव्ये करत असतील तर कृपया त्यांनी अशी वक्तव्ये करू नये असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

400-500 जणांविरोधात गुन्हा दाखल – किराडपुर्‍यात मध्यरात्रीतून झालेल्या राड्याप्रकरणात तब्बल 400 ते 500 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, किराडपुर्‍यातील हाणामारी, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी 400 ते 500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS