Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात टीपू-सुलतानवरून आंदोलन चिघळले

काँगे्रस-भाजपमध्ये दगडफेक ; काँगे्रसचे कार्यकर्ते जखमी पुणे : पुण्यात रविवारी राजकीय वातावरण तीव्र तणावपूर्ण झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप

मनरेगासाठी काँग्रेसचा देशव्यापी लढा
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
इराणमध्ये आंदोलनांना हिंसक वळण; 217 जणांचा मृत्यू

काँगे्रस-भाजपमध्ये दगडफेक ; काँगे्रसचे कार्यकर्ते जखमी
पुणे : पुण्यात रविवारी राजकीय वातावरण तीव्र तणावपूर्ण झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानानंतर शहरात तीव्र पडसाद उमटले. या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले. घोषणाबाजीदरम्यान वातावरण चिघळले आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली.
सपकाळ यांच्या विधानानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर रविवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान सरकारविरोधी आणि काँग्रेसविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही तेथे जमू लागले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा सुरू झाल्या. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच अचानक दगडफेक सुरू झाली. नेमकी सुरुवात कुणाकडून झाली, याबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दगडफेकीत काँग्रेसचे एक महिला व एक पुरुष कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले. काही वाहनांचे काच फुटून नुकसान झाले. परिसरात उभी असलेली काही चारचाकी वाहनेही बाधित झाली.
घटनेदरम्यान काही पोलिस कर्मचार्‍यांनाही दगड लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे परिसरात धावपळ उडाली. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अधिक मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तथापि, काँग्रेसकडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी आरोप केला की, पोलिसांच्या उपस्थितीतच दगडफेक झाली आणि वेळीच कठोर कारवाई झाली नाही. जगताप यांनी पुढे सांगितले की, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीतच ही घटना घडली. त्यांच्या समोर वाहनांची तोडफोड झाली, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास फरासखाना पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. परिसरात तणाव कायम असला तरी कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून पुढील काही दिवस शहरातील परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS