मसूर / वार्ताहर : समाजातील उपेक्षित वंचित प्राणिमात्रांचे संरक्षण व योग्य संगोपन होऊन सर्वतोपरी देखभाल व्हावी. या बहूउद्देशाने निर्मल प्रोटेक्शन
मसूर / वार्ताहर : समाजातील उपेक्षित वंचित प्राणिमात्रांचे संरक्षण व योग्य संगोपन होऊन सर्वतोपरी देखभाल व्हावी. या बहूउद्देशाने निर्मल प्रोटेक्शन क्लब कराड यांच्यावतीने शहापूर, ता. कराड येथे मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटलची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तथापि गेल्या 10-15 वर्षात अशा प्रकारचे कोणतेही कामकाज सुरू नसून अत्यंत भग्नावस्थेत इमारती पडून आहेत. येथे हॉस्पिटलचे कसलेही साहित्य अथवा कोणतीही जनावरे नाहीत. तरीही गेल्या अनेक वर्षापासून निर्मल प्रोडक्शन क्लबही संस्था प्राणीमात्रावर प्रेमदया करण्याच्या नावाखाली शासनाच्या व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप शहापूर ग्रामपंचायत व संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. ही जागा ग्रामपंचायतीला वर्ग करण्याची एकमुखी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहापूर, ता. कराड येथील गट क्रमांक व उपविभाग 143 /अ दोन हेक्टर गायरान जागा अध्यक्ष निर्मल प्रोटेक्शन क्लब कराड या संस्थेस दि. 6/0 5/2002 रोजी देण्यात आली होती. क्लबच्या वतीने भारतीय जीवजंतु कल्याण बोर्ड पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एक इमारत व चार शेडचे बांधकाम करण्यात आले. सुरुवातीला काही दिवस कागदोपत्री काम सुरू असल्याचे दाखवण्यात आले. तद्नंतर गेल्या 10-15 वर्षापासून या इमारती पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. ज्या प्रयोजनासाठी संस्थेने जागा घेतली. तशा प्रकारचे कोणतेही काम येथे सुरू नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या जागेत अवैद्य उत्खनन झालेले असून मुरूम काढून त्याची विल्हेवाट लावलेली असल्याचे दिसून येते. तसेच सदर इमारतीचे कसलाही बांधकाम परवाना घेतलेला नाही. कोणताही शासकीय कर न भरता ग्रामपंचायतीचा हजारो रुपयांचा कर बुडवला या इमारतीची नोंद ही अद्याप ग्रामपंचायतीला केलेली नाही. याठिकाणी हॉस्पिटलचे कसले साहित्य नाही कोणत्याही प्रकारचे जनावरे नाहीत केवळ भग्नावस्थेतील इमारती आहेत. याप्रकरणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांच्या कडे रीतसर तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशाने सदर वस्तुस्थितीचा पंचनामा करण्यासाठी सर्कल श्रीकृष्ण मर्ढेकर तलाठी आसवले हे घटनास्थळी आल्यानंतर काही शेडवरील पत्रा मोडकळीस आला आहे. शेडला दरवाजे नाहीत एक आरसीसी इमारत असून त्याचे खिडक्या दरवाजा मोडकळीस आले आहेत, अशी प्रत्यक्षदर्शींनी वस्तुस्थिती असल्याचा पंचनामा सरपंच ताजुद्दीन मुल्ला, उपसरपंच राजेंद्र शेलार, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल शेलार, मंगल पवार, अनिता मदने, दत्तात्रेय शेलार यासह ग्रामस्थांच्या सहाय्यांनी प्रत्यक्ष केला. त्यामुळे ही संस्था इतकी वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी संतप्त पावित्रा घेतला. केवळ पंचनाम्याच्या निमित्ताने आलेल्या संबंधित निर्मल क्लबच्या अध्यक्षाला हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये तुम्ही कसलेही काम करत नाही. येथे कसलीही जनावरे नाहीत इतकी वर्षे तुम्ही आमची दिशाभूल का केली. यासह ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्याला हुसकावून लावले. ही विनावापर असलेली जागा ग्रामपंचायतीला परत मिळण्याची मागणी केली. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्याना देण्यात आले आहे. सोलापूर गावाला आज अखेर सह्याद्री कारखाना पिंपरी पुनर्वसन, डिचोली पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य वीज कंपनी सब स्टेशन आदींना विनामोबदला जमीन जागा देणेबाबत मोलाचे योगदान दिले आहे. सध्या गावचा विस्तार वाढत असून शहापूर गावात स्मशानभुमी, क्रीडांगण, दफनभूमी, उपआरोग्य केंद्र या गरजेच्या बाबीसाठी संबंधित विनावापर असलेली जागा शासनाने ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी जेणेकरून त्या जागेचा गावच्या जनहितासाठी वापर करता येईल, अशी आग्रही मागणी केली आहे.
अॅनिमल हॉस्पिटल भलत्याच चाळ्यांनी चर्चेत
संबंधित अनिमल प्रोटेक्शन क्लबने मनेका गांधी जिवदया निर्मल हॉस्पिटल शहापूर येथे उभारले असले तरी तसा कसलाही फलक नाही, कसली जनावरे नाहीत, परंतू या ठिकाणी दारूच्या मोकळ्या बाटल्या जुगाराचे पत्ते पार्टीसाठी मांडलेली चूल आधी अवैध बाबी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्या. तसेच अवैद्य जोडप्यांचा वावरही युवकांचे हुल्लडबाजी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकारांना कोण पाठबळ देत होते, याचीही चौकशी होण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली.
संस्थेची मान्यता काढून घेण्यासाठी मंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करणार
या परिसरातील उपेक्षित प्राणिमात्रांचे संरक्षण संगोपन व्हावे. या उदात्त हेतूने शासनाने पाच एकर गायरानातील जागा हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिली. हॉस्पिटलची उभारणीही झाली, परंतू शासनाने ज्या बहुउद्देशाने जागा दिली. या उद्देशाला तिलांजली देऊन प्राणीमात्रावर दया प्रेम दाखवण्याच्या नावाखाली एवढ्या वर्षात ग्रामस्थांची व शासनाची झालेली फसवणूक शहापूरकर कदापि सहन करणार नाहीत. केंव्हा कागदोपत्री कामकाज व फोटोंचा अल्बम दाखवून दिशाभूल करणार्या अॅनिमल प्रोडक्शन क्लबची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी आम्ही पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सरपंच ताजुद्दिन मुन्ना व दत्तात्रय शेलार यांनी सांगितले.
COMMENTS