अहमदनगर प्रतिनिधी - नगर-राहुरीच्या कामात काही लोक ठेकेदाराकडून टक्केवारी मागतात, असा आरोप माझ्यावर व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरेंवर तुम्ही के
अहमदनगर प्रतिनिधी – नगर-राहुरीच्या कामात काही लोक ठेकेदाराकडून टक्केवारी मागतात, असा आरोप माझ्यावर व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरेंवर तुम्ही केला आहे. पण आम्हीही आमचे राजीनामे तयार ठेवतो व तुम्हीही तुमचे राजीनामे तयार ठेवा. टक्केवारीचा आरोप सिद्ध केला तर आम्ही राजीनामे देतो, नाहीतर तुम्ही द्या, असे जाहीर आव्हान पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना नाव न घेता शनिवारी दिले. मोेठे सर्व खोटे आहेत, ठेकेदारांवर हेच दबाव आणतात. त्यामुळे यांचे काळे धंदे आता आम्ही बाहेर काढू, असा इशाराही आ. लंके यांनी दिला.
नगर-पाथर्डी-नांदेड निर्मल महामार्ग, नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता व नगर-मिरजगाव-चापडगाव-करमाळा- टेंभुर्णी महामार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी आ. लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण आंदोलन केले. त्याची सांगता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी झाली. यानंतर आ. लंके समर्थकांनी जल्लोष केला. त्यांना खांद्यावर घेत उपोषणस्थळी त्यांची मिरवणूकही काढली. यावेळी प्रताप ढाकणे, क्षीतिज घुले, अशोक सावंत, संदेश कार्ले व विविध गावांतून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपोषणाला पाठिंब्याबद्दल आ. लंके यांनी सर्वांचे आभार मानले व ते मानताना विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
मारायचे टेंडर दिले होते का? आमचे आंदोलन म्हणजे स्टंट वा लोकसभा निवडणूक लढवण्याचा संदर्भ दिला जातो. पण लोकसभा निवडणुकीआधी पुलाखालून खूप पाणी वाहून जाणार आहे. मला आमदारकी मिळाली, हेच खूप झाले. जनतेच्या हृदयावर राज्य करीत असल्याने हे भाग्य मिळाले आहे, असे स्पष्ट करून आ. लंके म्हणाले, काहींनी माझी धास्ती घेतली आहे की, हा लोकसभेला उभा राहतो काय? त्यामुळे आमच्या उपोषण आंदोलनासाठी आरोग्य पथकही पाठवले नाही. जे पथक आले, त्यांना तेथे का गेला, अशी विचारणाही केली गेली. त्यामुळे आम्हाला मारायचे टेंडर तर दिले नाही ना, असे वाटत होते. सत्तेचा गैरवापर केला जात होता. ते कोणीही आम्हाला भेटायला आले नाही व अधिकार्यांनाही येऊ दिले नाही. पण आता गांधी सोडून सावरकरांसारखे क्रांतीकारी झाले पाहिजे, असे प्राजक्तने मला सांगितले आहे. त्यामुळे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…, अशा शब्दात सूचक इशारा आ. लंके यांनी यावेळी दिला.
गुन्हे मागे घेण्याचा शब्द – दोन दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत असताना प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे शुक्रवारी गावोगावच्या लोकांनी नगरकडे येणार्या रस्त्यांवर चक्का जाम केले होते. त्यावेळी अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शब्द दिला असून, हे दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही देऊन आ. लंके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी टीका केली. पण कर्तव्यशून्य लोकांवर मी बोलणार नाही. ज्यांचे समाजात काम नाही, समाजासाठी त्याग नाही व सकाळी झोपेतून उठले की फोटो काढून मीच मोठा नेता सांगणार्यांची टक्केवारी मी बाहेर काढणार आहे, असा कोणाचेही नाव न घेता इशारा त्यांनी दिला. पण त्यांचा हा इशारा भाजपच्या दक्षिण व नगर शहरातील जिल्हाध्यक्षांच्या दिशेने होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
दक्षिण जिल्हा स्वतंत्र करा – यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनीही कोणाचेही नाव न घेता उत्तर नगर जिल्ह्यातील राजकारण्यांवर टीका केली. मागील 50 वर्षात उत्तरेतील लोकांनी दक्षिणेतील लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची मस्ती आता काढावी लागणार आहे. जिल्हा परिषदेकडे येणार्या रुपयातील 70 पैसे उत्तरेत खर्च होतात व फक्त 30 पैसे दक्षिणेच्या वाट्याला येतात. सत्तेत राहूनही दक्षिण जिल्ह्याला सुकी भाकरी व चटणीही त्यांनी दिली नाही. त्यामुळे दक्षिण नगर जिल्हा स्वतंत्र करण्याची गरज आहे, असे भाष्यही ढाकणे यांनी केले.
COMMENTS