प्रा. शिंदे व कर्डिलेंच्या नाकावर टिच्चून विखेंना मिळाले मंत्रिपद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. शिंदे व कर्डिलेंच्या नाकावर टिच्चून विखेंना मिळाले मंत्रिपद

अन्य तीन इच्छुकांना आता विस्ताराची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : अडीच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पराभवास आ. राधाकृष्ण विखे कारणीभूत आहेत, असा जाहीर आरोप विधान परिषदेचे भाजप आमदार

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
अतिरिक्त ऊसाचे पंचनामे करा ; शेतकरी शिष्टमंडळाची मागणी
पेटत्या होळीमध्ये लहान मुलाला उचलून टाकलं | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : अडीच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पराभवास आ. राधाकृष्ण विखे कारणीभूत आहेत, असा जाहीर आरोप विधान परिषदेचे भाजप आमदार व माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला होता. पण अखेर या दोघांच्या नाकावर टिच्चून आ. विखेंनी राज्यातील नव्या शिंदेशाही-भाजप सरकारमध्ये मंत्रिपद पटकावले. शिवाय पहिल्या क्रमांकाने मंत्रिपदाची शपथ घेताना भाजपमधील आपले महत्त्व वाढल्याचा सूचक इशाराही पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना दिला आहे. दरम्यान, नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला केवळ एक मंत्रिपद मिळाल्याने प्रा. शिंदे, मोनिका राजळे व बबनराव पाचपुते या अन्य तीन इच्छुकांना आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी केला. यात दोन्ही गटांचे प्रत्येकी नऊ मंत्री घेतले गेले. विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकाची शपथ शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी घेतली. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारमध्ये ते तिसर्‍या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. शिंदे-फडणवीस जोडीने विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकताना 165 सदस्यांचे पाठबळ मिळवले होते व 2024च्या विधानसभा निवडणुकीत 200 आमदार निवडीचे ध्येयही जाहीर केले होते. हे ध्येय साध्य करण्यासाठी आ. विखेंच्या सर्वपक्षीय सदस्यांशी असलेल्या मैत्रीची व या राजकीय ताकदीची मदत होण्याच्या शक्यतेने त्यांना मंत्रिपदाची शपथ घेताना प्रथम संधी देऊन विशेष महत्त्व दिल्याचे बोलले जात आहे.

आठ पराभवांचा ठपका
2019ची निवडणूक शिवसेना-भाजप युतीने एकत्रित लढवली होती. त्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार कर्जत-जामखेडचे प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, कोपरगावला स्नेहलता कोल्हे, अकोल्यात वैभव पिचड व नेवाशाला बाळासाहेब मुरकुटे यांचे तर शिवसेनेचे नगरचे उमेदवार अनिल राठोड, पारनेरचे उमेदवार विजय औटी व श्रीरामपूरचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवास आ. विखे व त्यांचे चिरंजीव भाजपचे खा. डॉ. सुजय विखे कारणीभूत असल्याचा आरोप प्रा. शिंदे व कर्डिलेंच्या पुढाकाराने पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आला होता. भाजपच्या अन्य पराभूत आमदारांनीही त्यांना साथ दिली होती. शिवसेनेतूनही तसा सूर उमटत होता. त्यावेळी, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खा. डॉ. विखे यांना दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदार संघात तर शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना उत्तरेतील पाच विधानसभा मतदारसंघात कमीतकमी 25 ते 50 हजाराचे मताधिक्य मिळाले असताना नंतरच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे आठ आमदार पडल्याने यास विखे पिता-पुत्र कारणीभूत असल्याचा दावा केला गेला होता. त्यावेळी फडणवीस यांनी विजय पुराणिक यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने सर्व तक्रारदारांशी तसेच विखेंशीही संवाद साधला. पण त्यांचा अहवाल गुलदस्त्यातच राहिला. कारण, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्याने भाजप बॅकफूटवर गेला होता व पक्षांतर्गत तक्रारीही त्यामुळे बासनात गुंडाळल्या गेल्या.
या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे विरोधात काढलेल्या भाजपमधील पक्षांतर्गत ताणतणावही निवळले गेल्याचे सांगितले गेले होते. पण नुकतेच महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर काही दिवसांपूर्वीच माजी आ. कर्डिले यांनी फडणवीस यांना भेटून विखेंच्या संभाव्य मंत्रिपदाला तसेच नगरचे पालकमंत्री करण्याला विरोध केल्याची तसेच तुम्ही स्वतः (फडणवीस) नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे, अशी मागणीही केल्याची चर्चा होती. पण त्यावर कर्डिलेंसह अन्य कोणी अधिकृत भाष्य केले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता, नव्या सरकारात विखेंनी पटकावलेले मंत्रिपद प्रा. शिंदे-कर्डिलेंना धक्का मानले जात आहे.

विस्तारात मिळणार संधी?
राज्यात नवे सरकार आल्यावर मंत्रिपदासाठी आ. विखेंसह प्रा. शिंदे, मोनिका राजळे व बबनराव पाचपुते इच्छुक मानले जात होते. यातील विखेंची वर्णी पहिल्याच टप्प्यात लागली आहे. त्यामुळे राहिलेल्या तिघांपैकी कोणाला आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नसल्याने पुढच्या टप्प्यात आ. राजळे यांना संधी मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना आहे. प्रा. शिंदेंना विधान परिषदेचे आमदार केल्याने तसेच पाचपुते यांना प्रकृती अस्वास्थतेच्या कारणाने संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही बोलले जात आहे.

COMMENTS