Homeताज्या बातम्यासंपादकीय

सिध्दांतहीन राजकारण ! 

 न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील गेल्या काही महिन्यांपासून पासून हे सातत्याने सांगत आहेत की, काँग्रेसमध्ये नेतृत्व फक्त राहुल गांधी यांचे क्रा

इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 
संघटक, मुत्सद्दी आणि प्रभावशाली सिद्धरामय्या !
बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेतील अस्पष्टता ! 

 न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील गेल्या काही महिन्यांपासून पासून हे सातत्याने सांगत आहेत की, काँग्रेसमध्ये नेतृत्व फक्त राहुल गांधी यांचे क्रांतिकारी आहे, बाकी सगळे स्वार्थाने बरबटलेले आहेत! खरेतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांची सोबत हे नेते करत नाहीत, असं त्यांनी अनेक वेळा ठणकावून सांगितलं. त्याची प्रचिती पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यातून आली! काँग्रेसचे किमान ११ आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु, ही चर्चा गेल्या दोन वर्षापासून सातत्याने होत आहे. अशोक चव्हाण गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस सोडणार, असं म्हटलं जात होतं. राहुल गांधी यांची नांदेडला जी महासभा झाली होती; भारत जोडो यात्रेदरम्यान, त्या सभेचे आयोजन अशोक चव्हाण यांनीच केले होते. त्या सभेपूर्वी देखील ते काँग्रेस सोडणार अशी वाच्यता होती. परंतु, त्या सभेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं होतं की, असं कदापिही होणार नाही! देशातील इतर कोणतेही राजकीय पक्ष हे काँग्रेसच्या तुलनेने नवे आहेत. काँग्रेसने काँग्रेस नेत्यांच्या अनेक पिढ्यांना उभारी दिली आहे. सत्तेची आणि त्यातून संपत्तीची ही. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत राहून सत्तेचा मलिदा ज्या लोकांनी मिळवला, त्यांची तिसरी पिढी काँग्रेसच्या राजकारणात सत्तासीन राहिली. परंतु, ज्यावेळी काँग्रेसवरच वाईट दिवस आले, त्यावेळी हे सत्ता आणि संपन्नता भोगणारे, काँग्रेस सोडत आहेत. याचा अर्थ गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून जो आपला मूळ पक्ष सोडतो, तो भारतीय जनता पक्षातच प्रवेश घेतो, हे आता जवळपास अधोरेखित झाले आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी, ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी फार काही रहस्य राहिलेले नाही. कारण, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही; अशी बाब आता स्पष्ट होताना दिसते. या काँग्रेस छोडो प्रकरणात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की, काँग्रेसने सबंध दोन ते तीन पिढ्या ज्या आपल्या सत्तेच्या अंतर्गत पोसल्या, त्यांचं विचारांशी आणि विचारांच्या निष्ठेशी काहीही देणं घेणं नाही! काँग्रेस ही गांधी विचारांवर मोठी झालेली असली तरी, गांधीवाद हा केवळ आचार म्हणून त्यांच्याकडे आहे; विचार म्हणून त्यांनी गांधी विचार कधी आत्मसात केला नाही! केवळ राजकीय व्यवहार आणि सत्तेशी संधान या पलीकडे या लोकांना कोणतीही गोष्ट माहित नाही. परंतु, सर्वसामान्य जनतेला ते धर्मनिरपेक्ष, संविधानवादी अशी अनेक कारणं सांगून सामान्य जनतेला काँग्रेसच्या कच्छपी  लावत असतात. परंतु, आज संविधानाची कसोटीची वेळ आली असताना,  हे सर्व ज्या पक्षाने आपल्याला सत्ता दिली, त्याच पक्षाला सोडत आहेत. तेव्हा जनतेशी त्यांची कोणत्याही प्रकारची बांधिलकी नाही, हे अधोरेखित होते. जनता ही भोळसट असते. सर्वसामान्यपणे विचारांवर आणि विचारांच्या निष्ठा ठेवण्यावर जनतेचा भर असतो; परंतु, कोणताही राजकीय नेता जो सत्तेच्या राजकारणात आहे, तो आता सिद्धांतहीन राजकारणाचा भाग झाला आहे. त्यामुळे या सिद्धांतहीन राजकारणात कोणताही नेता कोणत्याही पक्षात गेला तरी त्या पक्षाची शक्ती वाढणं, आता शक्य राहिलेलं नाही! कारण, जनतेसमोर पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांची प्रतिमा आता स्पष्टपणे समोर आली. असल्यामुळे जनता त्यावर आता विचार करायला लागली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद निश्चितपणे उमटतील.

COMMENTS