चुरशीची ठरणार राष्ट्रपती पदाची निवडणूक !

Homeताज्या बातम्याराजकारण

चुरशीची ठरणार राष्ट्रपती पदाची निवडणूक !

चुर देशाचे नवे म्हणजे १६ वे राष्ट्रपती कोण असणार हे देशाच्या जनतेला २१ जुलै रोजी कळेल! सध्या या पदावर कोण विराजमान होईल, यासाठी केंद्रातील सत्ताधारी

धोकादायक 14 औषधांच्या विक्रीवर बंदी
कोरोना रुग्ण संख्या थांबता थांबेना
पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट

चुर देशाचे नवे म्हणजे १६ वे राष्ट्रपती कोण असणार हे देशाच्या जनतेला २१ जुलै रोजी कळेल! सध्या या पदावर कोण विराजमान होईल, यासाठी केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी सत्ताधारी एनडीए आघाडीकडे देखील मतमूल्यांचा पुरेसा कोटा नाही. एनडीए आघाडीला राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही स्थानिक पक्षांची मदत लागेलच! त्यासाठी ते बिजू जनता दल आणि तेलंगणाच्या टीआर‌एस या दोन पक्षांकडे आशेने बघताहेत. दरम्यान, १६ व्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यासाठी विरोधी पक्षांनी अतिशय गंभीरपणे प्रयत्न करायला सुरुवात केल्याचे चित्र, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची घोषणा झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात दिसून येत आहे. त्याचा भाग म्हणूनच दिल्लीच्या काॅन्स्टीट्यूशन क्लब येथे सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीस काॅंग्रेससह जवळपास सर्वच प्रादेशिक पक्ष उपस्थित आहेत. अपवाद ओवीसींचा एम‌आय‌एम आणि बिजू जनता दल व टीआर‌एस यांचा आहे. या तीन पक्षांचा काहीसा आक्षेप काॅंग्रेसवर आहे. परंतु, जमेची बाजू म्हणजे काॅंग्रेस स्वतः या निवडणुकीत उमेदवार देत नाहीए. नाही म्हणायला काॅंग्रेसने शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार रहावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, पवार यासाठी राजी नाहीत, असा सूर स्वतः पवारांनी आपल्या वक्तव्यातून लावला आहे. अर्थात पवारांचे नाव देशाच्या शीर्षस्थ पदांसाठी नेहमी चर्चेला येते; परंतु, उत्तर भारतीय राजकीय नेत्यांची नस अजून शरद पवार यांना पूर्णपणे कळलेली नाही. पंतप्रधान पदासाठी त्यांचे नाव दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापेक्षा आघाडीवर होते आणि जवळजवळ त्यांचे नाव निश्चित झाले असतानाच ऐनवेळी उत्तर भारतातील काही नेत्यांनी त्यांची संधी नरसिंहराव यांच्याकडे वर्ग केली होती, हा ताजा इतिहास पवार यांच्या विस्मरणात गेलेला नाही. त्यामुळे, राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव पुढे करताच पवारांनी त्यास नकार दिला. आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले असले तरी त्यांच्या नावामुळे सर्वसंमती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतोवर पवारांच्या मनात असेच असावे. पवारांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत, ही बाब सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशीही त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. परंतु, संघ – भाजप यांना २०२४ मध्ये काही निर्णायक गोष्टी साध्य करायच्या असल्याने त्यांना राष्ट्रपती पदावर आपल्या हक्काची व्यक्ती हवी आहे. तर दुसऱ्या बाजूला याच कारणास्तव लोकशाही सुरळीत ठेवण्यासाठी विरोधी पक्षालाही या निवडणुकीत यश हवे आहे. त्यामुळे, १६ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस उभी राहणार असून यात सर्वच विरोधी पक्षांना ताकद आणि एकजूटीने उतरावे लागेल किंबहूना तशा प्रकारची तयारी सुरू आहे.  जिंकण्याची खात्री निर्माण झाली तर पवार देखील यात उतरू शकतात. मात्र, या निवडणूकीच्या निमित्ताने जी दोन नावे चर्चेत आहेत त्यात सत्ताधारी आघाडीकडून अब्बास नक्वी आणि विरोधी आघाडीकडून गुलाम नबी आझाद. याचा अर्थ भारताविषयी मुस्लिम देशांमध्ये सध्या बनलेली प्रतिमा मिटविण्यासाठी अल्पसंख्यांक समुदायातून राष्ट्रपती दिला जाऊ शकतो; जेणेकरून ही प्रतिमा बदलण्यास मदत होईल. परंतु, संघ परिवार या पदावर कर्मठ संघ विचारांचे व्यक्तिमत्त्व आणण्याचा प्रयत्न करेल, तर तितकाच विरोधी आघाडीचाही प्रयत्न राहील की, विरोधी पक्ष आघाडीच्या व्यक्तीचीच या पदावर वर्णी लागावी. त्यामुळे, हे निश्चितपणे म्हणावे लागेल की, १६ व्या राष्ट्रपती पदाची निवडणूक ही भारतीय इतिहासातील अतिशय चुरशीच्या निवडणूकींपैकी असेल, यात शंका नाही!

COMMENTS