Homeताज्या बातम्यादेश

फायटर हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपती मुर्मू यांचे उड्डाण  

जैसलमेर : देशाच्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनानायिका असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी जैसलमेर येथील हवाई तळावरून स्वदेशी हलक्या लढाऊ हेल

देशाची अखंडता अबाधित ठेवण्यात सैन्याचे अमूल्य योगदान
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा.
मागास समुदायांच्या बदलासाठी शिक्षण महत्वाचे माध्यम

जैसलमेर : देशाच्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनानायिका असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी जैसलमेर येथील हवाई तळावरून स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ मधून उड्डाण करत नवा इतिहास घडवला. ‘प्रचंड’मध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण करणार्‍या त्या देशाच्या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत.
जैसलमेर हवाई तळावर सकाळी सुमारे सव्वानऊच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी हेलिकॉप्टरच्या तांत्रिक वैशिष्ट्यांबाबत आणि कार्यक्षमतेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रपती कॉकपिटमध्ये बसल्या आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर सुमारे सव्वादहाच्या सुमारास उड्डाण करण्यात आले. गट कॅप्टन एन. एस. बहुआ यांच्या सहकार्याने हे उड्डाण पार पडले. सुमारे पंचवीस मिनिटांच्या या उड्डाणादरम्यान राष्ट्रपतींनी सीमावर्ती परिसराची तसेच पोखरण येथील सराव क्षेत्राची हवाई पाहणी केली. जैसलमेरच्या ऐतिहासिक सोनार किल्ल्याच्या परिसरावरून हेलिकॉप्टर जात असताना राष्ट्रपतींनी कॉकपिटमधून सलामी देत देशवासीयांशी संवाद साधला. रेडिओ संदेशातून त्यांनी ‘प्रचंड’ हे स्वदेशी सामर्थ्य आणि आत्मनिर्भरतेचे प्रभावी प्रतीक असल्याचे सांगितले. देशाच्या शूर सैनिकांविषयी अभिमान व्यक्त करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि जय हिंद, जय भारत असा संदेश दिला. यापूर्वीही राष्ट्रपती मुर्मू यांनी लढाऊ विमानांतून उड्डाण करत धाडसी पाऊल उचलले होते. त्या अशा प्रकारची कामगिरी करणार्‍या पहिल्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे सशस्त्र दलांप्रती त्यांचा आत्मीय सहभाग आणि पाठिंबा अधोरेखित झाला आहे.

‘प्रचंड’ हे स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर
‘प्रचंड’ हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हलके लढाऊ हेलिकॉप्टर असून, उंच डोंगराळ भागात तसेच कठीण हवामानात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी ते सक्षम आहे. सीमावर्ती भागात वेगवान हालचाली, अचूक लक्ष्यभेद आणि हवाई सहाय्य देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या या उड्डाणामुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानावरील विश्‍वास अधिक दृढ झाल्याची भावना लष्करी वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS