पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याभोवती घिरट्या घालणारे प्रवचनकार !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याभोवती घिरट्या घालणारे प्रवचनकार !

मध्ययुगीन काळातील संत चळवळ ही महाराष्ट्रात इतकी खोलवर रूजली आहे.  बौध्द भिक्खु संघानंतर जर या देशात सर्व भेद तोडून एकत्रित येणारी कुठली चळवळ असेल तर

महाराष्ट्राची झेप…
सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी
 महाविकास आघाडी उमेदवाराच्या बॅनरवर स्थानिक नेत्यांचे फोटो टाळले

मध्ययुगीन काळातील संत चळवळ ही महाराष्ट्रात इतकी खोलवर रूजली आहे.  बौध्द भिक्खु संघानंतर जर या देशात सर्व भेद तोडून एकत्रित येणारी कुठली चळवळ असेल तर ती संत चळवळच म्हणावी लागेल. सर्वच जात-धर्म-प्रदेश-वर्गातील संत या चळवळीत होऊन गेले. प्रज्ञा आणि समता ही संत चळवळीचा मुलभूत तत्वे होती आणि आहेत. या चळवळीनेच वारकरी संप्रदाय उभा केला. वारकरी संप्रदायाने शील हे प्रमाण मानले. त्यामुळे, वारकरी संप्रदाय प्राणी मात्राची हिंसा, चोरी, खोटे बोलणे, व्यभिचार आणि मद्यपान करणे या गोष्टींना थारा दिला नाही. या पाचही बाबी वारकरी संप्रदायात वर्ज्य होत्या. किंबहुना, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल की, संत चळवळीच्या प्रभावाने समाज इतका शीलवान बनला होता की समाजाकडून अमान्य असणाऱ्या गोष्टी कधीच वर्तनात आल्या नव्हत्या. मदिरा प्राशन करणाऱ्या व्यक्ती प्राचीन काळापासून आपणांस दिसतात. परंतु, संत चळवळीने व्यक्तींना देखील त्यापासून परावृत्त केले. अशा या महाराष्ट्रात वाईन च्या विक्री वरून राजकारणात जे रणकंदन होतेय त्यात बंडातात्या कराडकर यांनी ज्या वादग्रस्त पध्दतीने उडी घेतली ते पाहता, संत चळवळ कोणत्या अवस्थेला नेण्याचं कारस्थान या मंडळींनी चालवले, असा प्रश्न निर्माण होतो. सत्ताधाऱ्यांनी वाईन विक्री चे जे अर्थकारण सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यास महाराष्ट्रात विरोध होतोय. परंतु, वर्तमान विरोधी पक्षांचा विरोध हा नितीमूल्यांच्या तत्त्वावर आधारित नाही. कारण सत्ताधारी आघाडीतून जे म्हटले गेले की, ज्या विरोधी नेत्यांना वाईन विषयक निर्णय रूचलेला नाही, त्यांनी आपल्या डिस्टिलरी बंद कराव्यात. याचा सरळ अर्थ होतो की, विरोधी पक्ष वाईन विक्री च्या प्रश्नावर जो विरोध करताहेत तो केवळ तोंडदेखला आहे. त्यांच्या विरोधाची मर्यादित असलेली नैतिकता पाहता आतून राजकारण करणाऱ्या संघ परिवाराने संघ शाखेचा भाग असणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजांना यात उतरवले. त्याचा अविभाज्य परिणाम म्हणून बंडातात्या कराडकर यांचे वादग्रस्त वक्तव्य आले. हल्ली वारकरी चळवळीचे प्रवचनकार म्हणवून घेणारे महिलांविषयी जी बेताल वक्तव्य करतात, त्यातून त्यांच्यातील स्त्री द्वेष्टेपणा स्पष्ट होतो. भारतीय समाज हा मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक समाज आहे. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी या देशातील स्त्रीयांना जे कतृत्व आणि अधिकार मिळवून दिले ते पाहता स्त्रियांनी आजच्या काळात साधलेली प्रगती जगाला अचंबित करणारी आहे. परंतु, स्त्री द्वेष्टी संस्कृती असणाऱ्यांनी कोणत्याही बाबीत स्त्रियांविषयी वक्तव्य करून स्त्रियांची बदनामी करण्याची जी मोहीम तथाकथित प्रवचनकारांच्या माध्यमातून चालवली आहे, ती आधी समाजानेच बंद पाडायला हवी. तथाकथित प्रवचनकार हे जर खरोखरच संत चळवळीचे पाईक असतील तर त्यांनी समाज आणि समाजातील तरूणांना असं घडवावं की व्यसनाचं नाव जरी काढलं तरी तरूणांना राग यायला हवा. परंतु, बाबा-महाराजांच्या या गर्दीत असं काही होताना दिसत नाही. याउलट एखाद्या रेशनच्या दुकानावर उडणार नाही, एवढी झुंबड दारूविक्री च्या दुकानांवर दिसतें. समाजात दिसणारे हे चित्र विदारक आहे. कोणतीही गोष्ट विरोध केल्याने मोठी होते. प्रवचनकारांनी समाजात आव्हान पेलायला हवं. त्यांनी समाजाला एवढं संस्कारित करावं की, वाईन आणि तत्सम गोष्टींचे नुसते नाव घेतलं तरी तरूणांना आणि समाजालाही राग यायला हवा. त्याविरुद्ध समाजाचे उस्फूर्त आंदोलन झाले पाहिजे. परंतु, समाजातून असे चित्र कधी उभे राहिले नाही, याचा अर्थ प्रवचनकार म्हणून मिरवणारे नुसते प्रसिध्दी आणि संपत्ती मिळवण्यात मश्गुल आहेत. बंडातात्या कराडकर यांनी केलेले वक्तव्य म्हणूनच निषेधार्ह आहे. आपल्या कर्तव्यात खरे न उतरणारे हे बाबा-महाराज नेमकं काय करताहेत यावर आता समाजानेही आघाडी उभारायला हवी. संत चळवळ ही समतेची चळवळ होती. या चळवळीत संपत्ती, प्रतिष्ठा, प्रसिध्दी यास कधीच थारा दिला गेला नाही. त्यामुळे, पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याभोवती घिरट्या घालणाऱ्या तथाकथित प्रवचनकारांना देखील आता नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS