छत्रपतींच्या कोणत्या इतिहासाशी बांधिलकी, हे राजकीय पक्षांनी जाहीर करावे!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

छत्रपतींच्या कोणत्या इतिहासाशी बांधिलकी, हे राजकीय पक्षांनी जाहीर करावे!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्रातील सर्व बहुजन इतिहासकारांनी संपूर्णपणे संशोधित केलेला आहे. मराठा इतिहासकार मा. म. देशमुख यांच्यापासून

बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार
प्रकल्प जपण्याची नागरिकांचीही जबाबदारी 
इंपिरीकल डेटाः नौटंकीचा खेळ (पुर्वार्ध)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्रातील सर्व बहुजन इतिहासकारांनी संपूर्णपणे संशोधित केलेला आहे. मराठा इतिहासकार मा. म. देशमुख यांच्यापासून तर सध्याचे डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यापर्यंत सर्वच इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु या स्वतः जिजामाताच असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. संत तुकाराम महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असण्याचे स्थान देखील या इतिहासकारांनी दिलेले आहे.  पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून जेम्स लेन या इतिहासकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारा इतिहास लिहिला. जेम्स लेन याच्या ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’, या पुस्तकावर महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात विवाद झाला होता आणि पुस्तकावर बंदीही करण्यात आली होती. पुस्तकावर बंदी हा तांत्रिक मुद्दा असला तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात किंवा एकूणच इतिहासाविषयी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास हे नसल्याचेच आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे वक्तव्य करून महाराष्ट्रात इतिहास विषयक प्रस्थापित सनातनी  इतिहासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यावरुन महाराष्ट्रात प्रचंड वादळ उठले आहे. उदयनराजे भोसले यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीदेखील यावर राज्यपालांच्या विरोधी वक्तव्य केलेले आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांचा एक व्हिडिओ या भूमिकेच्या अनुषंगाने व्हायरल झाला आहे, ज्यात खुद्द शरद पवार हे म्हणतात कि रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते, हेच सत्य आहे असे म्हटलेले आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चुकीचे वक्तव्य करणे ही बाब महाराष्ट्रातील सत्ताधारी किती गांभीर्याने घेतात हा देखील एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. यापूर्वी नगरच्या एका राजकीय व्यक्तींने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले वक्तव्य, हे आपण सर्वजण जाणतोच. तरीही, त्या व्यक्तीचे राजकीय पुनर्वसन झालेले महाराष्ट्राने पाहिले. ब.मो. पुरंदरे लिखित शिवाजी महाराज यांचा इतिहास बहुजन इतिहासकारांनी यापूर्वीच अमान्य केलेला. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासविषयी पुन्हा – पुन्हा खोडसाळपणा करणे, ही बाब आता गांभीर्यपूर्वक विचारात घ्यायला हवी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर या राज्यातील भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे सर्व पक्ष राजकीय सत्तेसाठी उपयोग करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार होणारी बदनामी या विरोधात हे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे आता जनतेने अधिक गंभीरपणे पाहायला हवे. अन्यथा अशा प्रकारची बदनामी विसरले जाऊन पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामी विषयीचा इतिहास विकृतपणे पुन्हा ५-१० वर्षानंतर डोके वर काढतो. साधारणपणे बारा वर्षापूर्वी जेम्स लेन प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला होता. तेव्हा असे वाटले होते की, आता छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याची हिंमत या राज्यात कोणीही करू शकत नाही. मात्र राज्याचे अग्रणी जेव्हा या विषयावर अमान्य असणारा इतिहासच पुन्हा लोकांच्या समोर मांडतात तेव्हा, त्यांना महाराष्ट्राचा खरा इतिहास माहीत नाही किंवा यापूर्वी झालेले वाद-विवाद त्यांना माहित नाही काय? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात संविधानिक पदावर किंवा अतिशय जबाबदारीच्या पदावर असलेली व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य करते तेव्हा ते वक्तव्य सहज म्हणून येत नाही तर त्या मागे पूर्वपीठिका निश्चितपणे काहीतरी असतेच, असा ठाम विश्वास वाटायला लागतो. कालचा जर आपण विचार केला तर औरंगाबाद येथे राज्याचे राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले वक्तव्य आणि सोनाली कुलकर्णी यांनी भाषाविषयक केलेले वक्तव्य ही दोन्ही वक्तव्य वेगळी असली तरी त्यांच्यातील एक सांस्कृतिक साम्य निश्‍चितपणे असल्याचा संशय महाराष्ट्राला आल्यावाचून राहात नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी पुन्हा पुन्हा बदनामीकारक मजकूर प्रस्तुत करण्याचा जो भाग चाललेला आहे तो सनातनी इतिहासकारांची तळी उचलणारा असल्यामुळे या महाराष्ट्रात यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस, मनसे या सर्व राजकीय पक्षांनी लोकांची मते मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उपयोग केला आहे, त्यांनी आता आपल्या इतिहासविषयक भूमिका जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे!

COMMENTS