राजकीय मुखवटे

Homeताज्या बातम्यादेश

राजकीय मुखवटे

राजकारणारच्या रंगमंचावर विविध पक्ष, संघटना आणि व्यक्ती रोज विविध मुखवटे घेऊन वावरत असतात. त्या मुखवटयामागे रोज वेगवेगळी भूमिका असते. या राजकारणाच्या

पवारांचे सोयीचे राजकारण …
मराठी फलकांचा मुद्दा ऐरणीवर
मृत्यूला आमंत्रण देणारा प्रवास…

राजकारणारच्या रंगमंचावर विविध पक्ष, संघटना आणि व्यक्ती रोज विविध मुखवटे घेऊन वावरत असतात. त्या मुखवटयामागे रोज वेगवेगळी भूमिका असते. या राजकारणाच्या रंगमंचावर ज्याला या भूमिका योग्य वेळी वठवता येतात, तो कायम यशस्वी होतो. मात्र कधी-कधी हे राजकीय मुखवटे फाटतात आणि त्यातील सत्य जनतेच्या समोर येते, तेव्हा अशा मुखवटयाची नाचक्की होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात याच राजकीय मुखवटयांनी धुमाकूळ घातला आहे. जनतेसमेार दाखवायचा चेहरा वेगळा आणि अंतर्गत चेहरा वेगळा अशीच फसगत सर्वसामान्य जनतेची होतांना दिसून येत आहे. 2019 मध्ये जेव्हा निवडणूका झाल्या तेव्हा, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवाय शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने राज्यात तीन पक्षाचे सरकार बनवले. शिवसेनेची कडवे हिंदुत्व तर दुसरीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस या तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले. विशेष म्हणजे यातून भाजपला एक शह देण्याचा प्रयत्न या आघाडीतून देण्यात आला. आणि तो काही प्रमाणात यशस्वी होत असतांना, महाराष्ट्रावर सातत्याने ईडी, सीबीआय आणि आयकरचे छापे पडायला लागले, आणि आघाडीतील पक्षांना हादरे बसायला लागले. यातूनच प्रताप सरनाईक यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहित आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन करण्याची ती परिभाषा होती. सरनाईकांच्या पत्राची धूळ खाली बसत नाही, तोच अनेक आमदार, खासदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनवणी केली. मात्र आता आघाडीतून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते, हे एव्हाणा उद्धव ठाकरे यांना माहित झाले होते. त्यातच अनेपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्या गळयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली, आणि त्यांच्यावर जबाबदारी मोठी येऊन पडली. यातून माघार घेणे, त्यांना शक्य नव्हते. तर दुसरीकडे त्यांच्या एकक सहकार्‍यांना ईडीने, सीबीआय, आयकरने जेरीस आणले होते, घायाळ केले होते. तर दुसरीकडे किरीट सोमय्या वाटेल ते वक्तव्य करून, शिवसेनेविरोधात वातावरण निर्मिती तयार करत होते. आज, याचा नंबर, उद्या त्याचा नंबर, असे सांगून सोमय्या आणि भाजप नेते तपास यंत्रणा आपल्याच खिशातील असल्यासारखे त्यांना नाचवत होते. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कितीतरी जण राजकीय मुखवटे घेऊन फिरत होते. राजकारण कधी कुठल्या थराला जाईल हे आपण कधीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. नीतीमूल्याचे राजकारण केव्हाच गंगेत वाहून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा एखादा नेता सत्तेवर पाणी सोडण्याची तयारी दाखवू शकतो. बाकी सारे शून्य. गेल्या दोन दशकात तर सत्तेला चिटकून राहण्यासाठी तर कमालीची सत्ता स्पर्धा वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार. या दोघांच्या सावलीत पक्ष उभे राहिले, पण ते विस्तारले नाहीत. संसदेत महाराष्ट्राची छाप पाडावी असे काही नेते त्यांच्या पक्षाने दिले नाही. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासूवृत्तीने सार्या देशाचा अवकाश आपली पंखांभोवती घेण्याची क्षमता असलेले किंवा त्यांच्या जवळपास जाणारे नेते त्यांनी उभे केले नाहीत. नेते तयार केले जात नाहीत, ते व्हावे लागतात, असा युक्तिवाद केला जात असला तरी एक सक्षम फळी तयार करण्याचे नेतृत्वाचे, पक्षाचे कसब असते. मात्र आता अशी फळी तयार होऊ दिली जात नाही. कारण फळी तयार केली, नेतृत्व तयार केले की, त्याचा नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे होतो. त्यामुळे महत्वाकांक्षेच्या या धुमार्‍यांना सातत्याने कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मग संघर्ष आणि बंडखोरांचा गट तयार होता. आणि त्यातून पक्षांतर, बंड हे सहन करावे लागते. मात्र यातून समन्वयाचा मार्ग किंवा महत्वाकांक्षी नेतृत्वांना सामावून घेण्यात अनेक पक्ष अपयशी ठरतांना दिसून येत आहे.

COMMENTS