पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!

माझ्या कालच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना एक कार्यकर्ता कमेंट पोस्ट करतांना म्हणतो की, पुरोगामी चळवळीतील लोक प्रस्थापित पक्षात जातांना ‘सत्ताधारी जमा

व्यावसायिक शिक्षण काळाची गरज ः आमदार मोनिका राजळे
मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचे सावट
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला

माझ्या कालच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना एक कार्यकर्ता कमेंट पोस्ट करतांना म्हणतो की, पुरोगामी चळवळीतील लोक प्रस्थापित पक्षात जातांना ‘सत्ताधारी जमात बना’’ हे बाबासाहेब आंबेडकरांचे कोटेशन देतात. प्रस्थापित पक्षात जातांना आपला व्यक्तीगत स्वार्थ लपविण्यासाठी ही माणसं महापुरूषांच्या टोप्या घालतात. वास्तविक महापुरूषांचे विचार संस्कार बनवून ‘डोक्यात’ घ्यायचे असतात, त्यांच्या टोप्या बनवून ‘डोक्यावर’ घालायच्या नसतात. आता सत्ताधारी जमात बनण्यासाठी प्रस्थापित पक्षात जायचे म्हणजे नेमके काय? बरे, हेप्रस्थापित पक्ष अशा जातींनी स्थापन केले आहेत, की जे शेकडो वर्षांपासून तुमच्यावर सत्ताधारी म्हणून सत्ता गाजवित आहेत. गुलामगिरीच्या काळात तुम्ही दासवर्णाचे होते व तुमच्यावर ते स्वामीवर्ण म्हणून सत्ता गाजवित होते. चातुर्वर्णव्यवस्थेच्या काळात तुम्ही शूद्रादिअतिशूद्र वर्णाचे होते व ते ब्राह्मण, बनिया, क्षत्रिय या तीन वर्णाच्या माध्यमातून तुमच्यावर सत्ता गाजवीत होते. त्यानंतर आली जातीव्यवस्था! जातीव्यवस्थेत तुम्ही हीन जातीचे आहेत व ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातून निघालेल्या उच्च-जाती बनून सत्ता गाजवीत आहेत. आता लोकशाही व्यवस्थेत पक्षांची सत्ता असते, म्हणून त्यांनी आपापल्या जातीचे पक्ष स्थापन करून सत्ता मिळवली आहे. ते पक्षप्रमुख असतात व तुमचे लोक तेथे दलाल-गुलाम असतात. फुले शाहू आंबेडकरांच्या जात्यंतक चळवळीतून लोकशाही व संविधान
मिळाल्यावर त्यांनी त्याचा उपयोग करून पक्ष स्थापन केलेत व आज ते या पक्षांच्या माध्यमातून सत्ताधारी झालेले आहेत. या प्रस्थापित जातींनी जे पक्ष स्थापन केले आहेत ते त्यांच्या जातीची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी स्थापन केले आहेत, तुम्हा शूद्रांना सत्ताधारी बनविण्यासाठी नाही. आज या प्रस्थापित जाती स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी लोकशाही व संविधान नष्ट करायला निघालेले आहेत, अशापरीस्थितीत ते लोकशाही व संविधान मानणार्‍या फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्ताधारी बनण्यासाठी पक्षात प्रवेश देतील काय???
आमचे लातूरचे ओबीसी नेते आण्णाराव पाटील नेहमी म्हणतात, ‘‘आपल्याला सत्तेत बसवून ते काय शेळ्या-मेंढ्या चारायला जातील का???’’ ‘‘कुणबटांना असेंब्लीत निवडून आणून आम्ही ब्राह्मणांनी काय शेतात जाऊन नांगर हाकायचा काय?’’ हेच टिळकांना म्हणायचे होते! सत्तेसाठी ब्राह्मणांच्याविरोधात लढणारे त्यावेळचे कुणबट आज मराठा-सरंजामदार झालेले आहेत व स्वजातीचे पक्ष स्थापन करून सत्ताधारी- जमात बनलेले आहेत. मराठा जात सत्ताधारी बनल्यावर तीही इतर शूद्र जातींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचेच काम करीत आहे. उद्या माळी किंवा धनगर जात अशाच काही कारणास्तव सत्ताधारी झाल्यात तर त्याही इतर शूद्रांना अशाच सत्तेपासून वंचित
ठेवतील, यात शंका नाही. जोपर्यंत जातीव्यवस्था जिवंत व बळकट आहे, तोपर्यंत ब्राह्मण जात प्रथम सत्ताधारी राहील, फक्त दुय्यम स्थानावरच्या सत्ताधारी जाती बदलत राहतील. बौद्ध म्हणविणारे महार लोक जरी उद्या सत्ताधारी झालेत, तरी सत्तासोपानाच्या या जातीरचनेत काहीही फरक पडणार नाही. तेव्हा प्रश्न सत्ताधारी होण्याचा नाही, तर एकूणच व्यवस्था बदलण्याचा आहे. व्यवस्था बदलण्यासाठी सत्ताधारी जमात बनायचे आहे. डॉ. बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते. ‘‘सत्तेवाचूनी सकळ कळा, झाल्या अवकळा, पुसा मनाला!!’’ हे तात्यासाहेब महात्मा फुलेंचे म्हणणे याच अर्थाने घेतले पाहिजे. जे फुले आंबेडकर जातीव्यवस्थाच नष्ट करायला निघालेले होते, ते कोणत्या तरी एका जाती-जमातीने सत्ताधारी होण्याचे सूचवतीलच कसे? सत्ताधारी जमात म्हणजे सत्ताधारी क्लास वा समाजघटक जो
जात्यंतक तत्वज्ञान स्वीकारून सत्तेचा वापर जातीअंतासाठी करेल. त्यांनी आयुष्यभर जात्यंतक तत्वज्ञानाची उभारणी केली ती केवळ एखाद्या जातीला सत्तेत बसविण्यासाठी नाही. जवळ जवळ सर्वच बहुजन जातींमध्ये हा गोड गैरसमज आहे की, आपल्या जातीतून जास्तीतजास्त आमदार-खासदार निवडून दिलेत, जास्तीतजास्त मंत्री झालेत की आपण झालो सत्ताधारी! तुमच्या जातीचा माणूस मंत्री मुख्यमंत्रीच काय, प्रधानमंत्री व राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही तुमची जात सत्ताधारी होणे तर दुरच, तुमच्या जातीचा साधा विकासही होऊ शकत नाही, हे वसंतराव नाईक, छगन भुजबळ, गेहलोत, मोदी, कोवीन्द यांनी सिद्ध केले आहे आणी आता द्रोपदी मुर्मूही तेच सिद्ध करणार आहेत.
एखाद्या जातीत प्रस्थापित पक्षांच्या तिकीटावर आमदार-खासदारांची संख्या वाढणे, म्हणजे दलाल-भडव्यांची संख्या वाढणे. दलालांची संख्या जितकी जास्त तितका समाज जास्त विकला जाणार व जास्त खड्यात जाणार! आर.एस.एस ने शिवसेनेला सत्ताधारी ब्राह्मणी छावणीत घेण्यासाठी 1994-95 साली त्यांचे केडर कॅम्प घेतले होते. त्याआधी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात झालेल्या बाबा पुरंदरेंच्या व्याख्यानातून शिवसेनिकांची वैचारिक मशागत झालेली होतीच! शिवसेनेला शेंडी-जाणव्याच्या हिंदुत्वाची दिक्षा दिल्यावरच भाजपाने युती केली होती. ब्राह्मणी छावणीतही फुट पडू शकते, यात वाद नाही. परंतू आता पडलेली ही फुट राजकीय आहे, वैचारिक नाही. शिवसेना भाजपाच्या युतीतून मुक्त होऊन कॉंग्रेस- राष्ट्रवादीसारख्या लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष पक्षाच्या आघाडीत आली, याचा अर्थ शिवसेना पुरोगामी झाली काय? अशा पुरोगामी शिवसेनेला बळ देण्यासाठी पुरोगाम्यांनीशिवसेनेत जावे काय? शिवसेनेत गेलेले पुरोगामी डायरेक्ट उपनेते बनतात, ही चांगली गोष्ट आहे. शिवसेनेत उपनेते बनने म्हणजे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होता येणे. पक्षांतर्गत मिळालेल्या या सत्तेचा सदुपयोग करीत ह्या पुरोगामी नेत्यांनी शिवसेनेचे पुरोगामीत्व भक्कम करण्यासाठी पुढील कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे-
1) आर.एस.एस ने ज्याप्रमाणे शिवसेनेला ब्राह्मणी बनविण्यासाठी शिवसैनिकांचे केडर कॅम्प घेतलेत, तसे केडर कॅम्प शिवसेनेत गेलेल्या पुरोगामी नेत्यांनी घेतले पाहिजेत.
2) प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य मोठ्याप्रमाणात प्रकाशित करून ते शिवसैनिकांना नाममात्र किंमतीत दिले पाहिजे. असे अजून अनेक कृतीकार्यक्रम सूचविता येतील. परंतू आपल्या पुरोगाम्यांची औकात पाहता उपरोक्त दोन कार्यक्रमही पुरेसे आहेत. शिवसेनेत गेलेल्या ताईचे
अभिनंदन ज्यांनी ज्यांनी केलेले आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी उपरोक्तप्रमाणे कृतीकार्यक्रमाचा आशय असलेले पत्र या ताईंच्या नावे पाठवले पाहिजे. असे हजार पत्रे जरी गेलीत तरी त्या ताईवर शिवसेनेला पुरोगामी बनविण्याचे दडपण येईल. फाटाफुटीच्या लढाईत अस्तित्वच पणाला लागलेले असतांना शिवसेनाप्रमुखही तुमच्या पत्रांचा निश्चित विचार करतील व उपरोक्त कृतीकार्यक्रम राबवतील. कट्टर ब्राह्मणी छावणीतून बाहेर पडलेल्या शिवसेनासारख्या रेडीमेड पक्षाला जात्यंतक पुरोगामी बनविण्याची फार मोठी संधी चालून आलेली आहे. एकतर एखाद्या रेडीमेड राजकीय पक्षाला पुरोगामी बनवून फुलेआंबेडकरांचे जात्यंतक स्वप्न पूर्ण करा किंवा स्वतःचा जात्यंतक पक्ष निर्माण करा. शिवसेनेचा पहिला पर्याय तुमच्यासमोर आहेच, तामीळनाडूच्या धर्तीवर ‘‘ओबीसी-रिपब्लीकन राजकीय आघाडी’’ स्थापन करून दुसरा पर्यायही आम्ही दिलेला आहेच. कोणत्याही एका पर्यायाची ताबडतोब निवड करा व कामाला लागा, अन्यथा पेशवाईचा ब्रह्मसैतान तुमचा घास घेण्यासाठी तुमच्या दारात येऊन ठेपलेला आहेच! जयजोती, जयजोती, सत्य कि जय हो!
लेखक- प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 88 301 27 270
ईमेल- [email protected]

COMMENTS