फलटण : डिस्टलरीने रस्त्यावर सोडलेले मळीचे दुषित पाणी. फलटण / प्रतिनिधी : फलटण नांदल रस्त्यावर न्यू फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी डिव्हिजन या कंपनीने क
फलटण / प्रतिनिधी : फलटण नांदल रस्त्यावर न्यू फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी डिव्हिजन या कंपनीने कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता नांदल, मिरगाव, ढवळेवाडी, निंभोरे परिसरातील रस्त्यावर मळीचे दुषित पाणी सोडून देत असल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नांदल-फलटण रस्त्यानजीक आमची घरे, शेतजमीनी आहेत. आम्हाला दररोजच या मार्गाने ये-जा करावी लागते. तरी नांदल रस्त्याचे बर्यापैकी खडी व मुरूमीकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यावर डिस्टलरीचे टँकर राजरोसपणे नांदल रस्त्यावर विनापरवानगी मळीचे दुषित पाणी सोडत आहेत. याबाबत डिस्टलरी कंपनीने कोणताही परवाना घेतला नाही. मळीचे पाणी रस्त्यावर सोडल्याने या पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होत आहे. दुर्गंधीमुळे लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांनी वारंवार डिस्टलरी कंपनीस मळीचे पाणी सोडू नये, अशा सुचना देवूनही कंपनी प्रशासन कोणत्याही शेतकर्यास दाद देत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिकांनी संबंधीत डिस्टलरी अधिकारी, संचालक तसेच वाहन चालकांना सुचना करूनही रस्त्यावर मळीचे पाणी सोडले आहे. हे पाणी परिसरातील विहरीतील पाण्यात मिसळल्याने पाणी दुषीत झाले आहे. सध्या या परिसरातील पाणी पिण्यायोग्य व शेतीसाठी योग्य राहिले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार कि. मी. पायपीट करावी लागत आहे. या प्रकाराकडे न्यु फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी डिव्हिजन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
फलटण तहसिलदारांनी संपुर्ण परिसराची पाहणी करून येत्या आठ दिवसात कंपनीवर कायदेशिर कारवाई करावी. अन्यथ न्यु फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी डिव्हिजन कंपनीस ग्रामस्थ व शेतकरी, शेतमजूरांच्यावतीने कंपनीस टाळे लावण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर नांदल, मिरगाव, ढवळेवाडी, निंभोरे येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी डिस्टलरी डिव्हिजन कंपनीकडून होणार्या प्रदूषणाकडे अनेक वर्षांपासून आर्थिक हितसंबंध असल्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता कारवाई न झाल्यास सातारा येथील प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयावर मोर्चे काढणार असल्याने ग्रामस्थांनी सांगितले आहे.
COMMENTS