कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडलात 25 दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसणार असून उत्पादनात फा
कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडलात 25 दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसणार असून उत्पादनात फार मोठी घट होणार आहे.त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्यांना आगाऊ पिकविमा भरपाई द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव मंडलात 25 दिवस, कोपरगाव मंडलात 23 दिवस, रवंदा मंडलात 23 दिवस, पोहेगाव मंडलात 21 दिवस, दहेगाव मंडलात 13 दिवस व मतदारसंघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडलात देखील पावसाचा खंड पडला आहे. त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील बाजरी,मका, कापूस, तूर, सोयाबीन,भुईमुग, कांदा आदी पिकांना बसणार असून खरीप हंगामातील उत्पादन हे जवळपास 50 टक्क्यांपेक्षाही जास्त घटणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. खरीप हंगाम 2023-24 मध्ये कोपरगाव तालुक्यातील 33,488 शेतकर्यांनी 38,120.47 हेक्टर क्षेत्रावर व पुणतांबा मंडलात देखील 11,574 शेतकर्यांनी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. लहरी हवामानाचा फटका पिकांना बसून नुकसान होवू नये त्यासाठी कोपरगाव मतदार संघातील एकूण 45,062 शेतकर्यांनी बाजरी,मका, कापूस, तूर, सोयाबीन,भुईमुग, कांदा आदी पिकांचे 64,023 पिकविमा अर्ज भरलेले आहे.
नुकसान भरपाई आगाऊ देण्याच्या या तरतुदीनुसार कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्यांना खरीप हंगामाच्या होणार्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने आगाऊ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. तसेच शेतकर्यांना पिकविम्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी. त्यासाठी शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करावे. त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कृषी-महसूल विभागाचे पथक तयार करण्यासाठी सबंधित विभागाला तातडीने सूचना कराव्यात. अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
-चौकट ः नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद
शासन निर्णय व पिकविम्याच्या तरतुदीनूसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर,पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकर्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल.तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्केपर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे.
COMMENTS