महाराष्ट्राच्या संदर्भात राजकीय घडामोडींनी सध्या प्रसार माध्यमांची जागा व्यापलेली दिसते. आज राजधानी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची शरद पवार यां
महाराष्ट्राच्या संदर्भात राजकीय घडामोडींनी सध्या प्रसार माध्यमांची जागा व्यापलेली दिसते. आज राजधानी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रसार माध्यमातून यावर महाराष्ट्राच्या राजकारणात आता उलथापालथ होईल, अशाप्रकारे संशयास्पद बातम्या पेरण्याची जणू काही सुपारी घेतल्यागत वक्तव्यं केली जात आहेत. वास्तविक, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असले तरी केंद्रीय राजकारणात त्यांचा अनुभव आत्ताशी आठ वर्षाचा झालेला आहे. तर शरद पवार यांचे संसदीय राजकारण दीर्घकालीन असले तरी केंद्रीय राजकारणाचा त्यांचा अनुभव हा पस्तीस वर्षांचा आहे. म्हणजे केंद्रीय राजकारणातील मोदींच्या अनुभवापेक्षा जवळपास साडेचार पटींनी जास्त. या दोन राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर कंड्या पिकवणे हा जसा राजकीय लोकांचा एक प्रकारे छंद झालेला आहे, तसाच तो वरकरणी तटस्थ भासणार्या प्रसार माध्यमांचाही बनला आहे. शरद पवार यांच्या केंद्रीय राजकारणाचा दीर्घ अनुभव आणि केंद्रीय सत्तेतील त्यांचे दिर्घ काळाचे वास्तव्य जर आपण पाहिले, तर, केंद्रीय सत्ताकारण, राजकारण आणि वय या तिन्ही गोष्टींमध्ये मोदी हे शरद पवारांना ज्युनिअर आहेत, असेच म्हणावे लागेल. देशातील राजकारणात मोदी सध्या मजबूत सत्ताधीश असले तरी राजकारणाचा अनुभव हा व्यक्तिच्या मनावर नेहमी प्रभाव पाडत असतो. यादृष्टीने जर आपण पाहिले तर पंतप्रधान असूनही मोदी हे शरद पवारांच्या समोर निश्चितपणे एक दबावाच्या राजकारणाच्या अंतर्गतच वावरत असतात, ही बाब राजकारणात मानसिकदृष्ट्या सिद्ध होणारी आहे. शरद पवार हे एवढ्या उघडपणे जेव्हा मोदींची भेट घेतात, तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मोडतोड होणार नाही याची, खरे तर ती साक्ष असते. किंबहुना महा विकास आघाडी या भेटीने अधिक मजबूतच होईल, असाच अर्थ या भेटीचा दिसतो. कमी अनुभवात अधिक मुत्सद्दी राजकीय नेत्याच्या अविर्भावात वावरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा सत्ताविहीन नेता म्हणून संघर्षरत ठेवण्यामागे मोदीं-शहांचा एक प्रकारे हात आहे, अशी चर्चा महाविकास आघाडी सरकारचे गठन झाले, तेव्हाच मोठ्या प्रमाणात झाली होती. पाण्यातील मासा पाण्याबाहेर आल्यानंतर त्याची ज्या प्रकारे तडफड होते, तशीच, महाराष्ट्राची सत्ता पाच वर्ष सलग अनुभवल्यानंतर आणि सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आणलेल्या भाजपाला आणि पर्यायाने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. याउलट त्यांना विरोधात बसण्याची मिळालेली संधी, यात एक प्रकारे मोदी – शहा यांचा राजकीय मुत्सद्दीपणाच अधिक आहे; असा त्या गोष्टीचा अर्थ आहे. त्यामुळे आज शरद पवार यांनी मोदी यांची घेतलेली भेट ही फडणवीसांचा संघर्ष आणखी अधिक काळ तेवत ठेवण्याचाच तो प्रकार आहे, यावर शिक्कामोर्तब होते. याकडे मात्र प्रसारमाध्यम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय असे वाटते. केंद्रीय राजकारणात किंवा केंद्रीय सत्तेत आज पर्यंत उत्तर भारतीय राज्यांचा प्रभाव राहिलेला होता. परंतु, २०१४ नंतर भारतीय राजकारण हे भांडवलदारांच्या इशाऱ्यावर अधिक चालू लागल्याने, उत्तर भारतीय राजकारणाचा वरचष्मा संपुष्टात आल्यामुळे मोदी – शहा जोडी ही केंद्रातील सर्व शक्तिमान सत्ता जोडी असल्याने कोणत्या नेत्याला किती आणि कधीपर्यंत संघर्षरत ठेवले पाहिजे, याची जाण त्यांना निश्चित आहे. पुढच्या राजकारणात किंवा पुढील केंद्रीय सत्तेत कोणताही नेता वरचढ होऊ नये, याची काळजी घेणारे मोदी-शहा यांनी शरद पवार यांच्या राजकारणाला अधिक महत्त्व देण्यातून फडणवीस यांचा संघर्ष चालूच ठेवायचा संकेत देत राहणं हीच त्यांच्या सध्याच्या राजकारणाचा आणि राजकीय भेटींची अर्थसंगती आहे. एका वाक्यात सांगायचे तर फडणवीस यांना राजकीय सत्तेची हूल देत राहणं, ही सध्याच्या केंद्रीय सत्तेची रणनीती आहे.
COMMENTS