मंत्री शंभूराज देसाईची भूमिका निर्णायक; अशोक पाटील यांचे नाव आघाडीवरपाटण / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात बलाढ्य भाजपला शिंदेसेनेने लढत देत तालुक

मंत्री शंभूराज देसाईची भूमिका निर्णायक; अशोक पाटील यांचे नाव आघाडीवर
पाटण / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात बलाढ्य भाजपला शिंदेसेनेने लढत देत तालुक्यासह जिल्ह्यात दिग्विजयी कामगिरी केली आहे. यामध्ये पाटण तालुका केंद्रस्थानी आहे. आता झेडपीच्या सत्तास्थापनेकडे केवळ जिल्हाचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा व पाटण तालुक्यात विरोधकांना धूळ चारत मिळवलेले यश केवळ स्थानिक विजय न ठरता जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाला साजेसा ठरला आहे. विकासकामांचा वेग, मजबूत संघटन बांधणी, देसाई परिवाराचा जनसंपर्क, पक्षप्रवेशांची मालिका आणि कार्यकर्त्यांची एकदिलाने उभी राहिलेली फळी याचा हा परिपाक मानला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा पाटण तालुक्याकडे केंद्रित झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीपदांच्या निवडी दरम्यान दूरदृष्टी महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे जिल्हा बँक व इतर घडामोडीत नेते मंडळीचा शब्द, वजन आणि चाल किती प्रभावी राहणार, यावर सत्तेचा सारीपाट रंगणार आहे. या सत्तासमीकरणात पाटण तालुका ‘निर्णायक शक्ती’ म्हणून पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पाटणकरांच्या बालेकिल्ल्याला हादरा देत जिल्हा परिषदेत दमदार प्रवेश करणारे अशोक पाटील हे झेडपी उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. शांत, संयमी कार्यशैली, मंत्री शंभूराज देसाई यांचे विश्वासू व संघटनातील सातत्यपूर्ण कामामुळे त्यांच्या नावाला विशेष महत्व प्राप्त झाले. पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या सहा सदस्यांमध्ये ते सध्या एकमेव पुरुष सदस्य आहेत. ज्येष्ठतेचा विचार करता ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. परिवर्तन झालेल्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे या जनतेतील मागणीमध्येही अशोक पाटील हे आघाडीवर आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेत काय घडामोडी घडतील ते पाहावे लागेल

COMMENTS