कोल्हापूर : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ६५ लक्ष मिळकत पत्रिकेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आभासी पद्धतीने वाटप करण्यात आले. कोल्हापूर
कोल्हापूर : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ६५ लक्ष मिळकत पत्रिकेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आभासी पद्धतीने वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले होते. यावेळी खासदार धनजंय महाडिक यांनी स्वामित्व योजनेबाबत बोलताना नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्यातील ५० मिळकत धारकांना प्रॉप्रर्टी कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख, मिळकत पत्रिका धारक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामित्व योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. स्वामित्व योजनेमुळे देशातील अनेक कुटुंबांच्या राहणीमानात बदल होत असून या न्यायसंहितेमुळे अनेकांचे प्रश्नही सुटत आहेत. नव्या डिजीटल प्रक्रियेमुळे मिळकत मोजणी सोपी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमादिवशी दोन हजार जणांना प्रॉप्रर्टी कार्ड मिळाले. आत्तापर्यंत जिल्ह्यात ९२ हजार २४ कार्ड तयार झाली आहेत. कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वात जास्त प्रॉप्रटी कार्ड वितरीत करून अग्रेसर राहील. जिल्ह्यातील युवकांमध्ये नवनवीन कल्पना आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वामित्व योजनेतून त्यांना मदत होत आहे असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वामित्व योजनेतून मिळालेला अधिकार अभिलेख महत्त्वाचा असून यामुळे अनेकांना वेगवेगळे लाभ घेण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, स्वामित्व योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील काम पुर्ण झाले आहे. आता गतीने प्रॉप्रर्टी कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी विविध बँकांमधून कर्ज सोप्या पद्धतीने मिळेल.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले यांनी विविध चित्रफीत आणि सादरीकरणातून स्वामित्व योजनेची व ड्रोनद्वारे केल्या जाणा-या मोजणीची माहिती दिली. तसेच यावेळी मेरी पंचायत या मोबाईल ॲपबाबतही माहिती सांगण्यात आली. कोल्हापूर जिल्हयात आत्तापर्यंत ३५० हून अधिक जणांनी प्रॉप्रटी कार्ड मिळाल्यानंतर विविध बँकांकडून कर्ज घेवून आपल्या व्यावसायात यशस्वी भरारी घेतली आहे. ही आकडेवारी राज्यातील एकुण लाभ घेतलेल्या हजार लाभार्थ्यांमध्ये अग्रेसर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपस्थित नागरिकांनी त्यांना मिळालेल्या प्रॉप्रर्टी कार्ड नंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रत्येकानेच आपल्या विविध व्यवसायांमधून अमुलाग्र बदल झाल्याचे सांगितले. कार्यक्रमावेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रॉप्रर्टी कार्डपैकी ५० जणांना कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थितांना स्वच्छतेची व अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.
COMMENTS