पुणे / प्रतिनिधी : गेल्या चार दिवसांमध्ये महावितरणने वीजचोरी करणार्या आकडे बहाद्दरांविरुध्द विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात केली आहे. या
पुणे / प्रतिनिधी : गेल्या चार दिवसांमध्ये महावितरणने वीजचोरी करणार्या आकडे बहाद्दरांविरुध्द विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात केली आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनधिकृत वीजजोडणीचे 7 हजार 220 आकडे काढून टाकण्यात आले असून त्यासाठी वापरलेले पंप, केबल व स्टार्टर आदी साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. आकडेमुक्त वीजवाहिन्यांसाठी ही कारवाई यापुढेही कायम ठेवण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले.
सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा करण्यासाठी हे अनधिकृत आकडे अडथळे ठरत असल्याने वीजचोरीविरुद्ध ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात गेल्या चार दिवसांमध्ये 7 हजार 220 ठिकाणी अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी सुरु असल्याचे दिसून आले. हे आकडे तात्काळ काढून टाकण्यासोबतच त्यासाठी वापरण्यात आलेले केबल, पंप, स्टार्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
धडक कारवाईत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये 3021, सातारा जिल्हा 703, कोल्हापूर 35, सांगली 457 आणि पुणे जिल्हा अंतर्गत पुणे ग्रामीण, गणेशखिंड, रास्तापेठ मंडलमध्ये 573 आणि बारामती ग्रामीण मंडलमध्ये 2431 आकडे आढळून आले. ते ताबडतोब काढून टाकण्यात आले आहेत. यातील वीजचोरीचे बहुतांश आकडे कृषी वापरासाठी असल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, वीजवाहिनी किंवा रोहित्र अतिभारित होणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, विद्युत अपघात आदी प्रकार टाळले जात आहेत. अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. सोबतच विजेच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी ही कारवाई अतिशय पुरक ठरत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून वीजचोरीविरुध्द नियमित कारवाईसह विशेष एक दिवसीय मोहीम सुरु करण्यात आली. विशेष मोहिमांमध्ये आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत 6 हजार 428 ठिकाणी 7 कोटी 71 लाख 45 हजार रुपयांच्या अनाधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला. इतर ठिकाणाहून आकडे किंवा केबल टाकून चोरीद्वारे वीज वापर करताना स्वतःच्या घरातील लहान-मोठ्या व्यक्तींच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जीवघेणा अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
COMMENTS