आ. आशुतोष काळे यांची पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याकडे मागणी कोपरगाव : मतदारसंघात पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू, मुरूम व मातीचा बेसुमार उप
आ. आशुतोष काळे यांची पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याकडे मागणी
कोपरगाव : मतदारसंघात पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू, मुरूम व मातीचा बेसुमार उपसा सुरू असून शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बोकाळले असून त्यातून मिळणाऱ्या आडमाप पैशाच्या जोरावर हातात गावठी कट्टे घेऊन तयार केलेले रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी कष्टात व कमी वेळेत मोठा आर्थिक मोबदला मिळत असल्याने तरुणाई अवैध व्यवसायाच्या विळख्यात अडकत चालली आहे. या सर्व प्रकारांना महसूल व पोलीस प्रशासनाची साथ मिळत असल्याचा आरोप करत अवैध व्यवसायांचा कायमस्वरूपी बिमोड करून कोपरगाव मतदारसंघ दहशतमुक्त करावा, अशी ठाम मागणी आ. काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली.
कोपरगाव मतदारसंघातील बिघडलेल्या कायदा- सुव्यवस्थेबाबत आमदार काळे आक्रमक झाले असून शनिवारी (दि. २४) शिर्डी उपविभागीय कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांचा सविस्तर पाढाच वाचला.
कोपरगाव मतदारसंघातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरटीओ व स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकत्रित कारवाई करणे आवश्यक असल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट केले. अवैध व्यवसायिकांविरोधात संघटित गुन्हे दाखल करून ज्या विभागात अधिक कडक शिक्षेची तरतूद आहे त्या विभागातून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्यमार्ग ६५ वरून झगडे फाटा मार्गे अहिल्यानगर व संगमनेरकडे जाणारी अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस व महसूल विभागाच्या स्वतंत्र दोन पथकांची निर्मिती करून एकाचवेळी संयुक्त कारवाई करत अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्याची ग्वाही दिली. तातडीने कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिकराव आहेर उपस्थित होते.

COMMENTS