यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?

शिवसेना व काँग्रेसमध्ये दोन गट, तर भाजप-मनसे क्षीण

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना सावटापासून मुक्त झालेल्या नगर शहराच्या यंदाच्या गणेशोत्सवावर राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसू लागला आहे. उपनगरांतील बहुतांश

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करायचीय, पण….काष्टीच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना
निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?
माधवराव बोठे यांचे वृद्धपकाळाने निधन

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना सावटापासून मुक्त झालेल्या नगर शहराच्या यंदाच्या गणेशोत्सवावर राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसू लागला आहे. उपनगरांतील बहुतांश परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे फोटो झळकले आहेत. मध्य नगर शहरावर शिवसेनेचे वर्चस्व असले तरी त्यांच्यात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडल्याने या गटांनी आपापल्या नेत्यांच्या फोटोंना पसंती दिली आहे व त्यांची ताकदही विभागली गेली आहे. काँग्रेसमध्येही संघटना व नगरसेवक वेगवेगळे असल्याने त्यांचेही स्वतंत्र व मोजकेच अस्तित्व दिसत आहे. दरम्यान, भाजप व मनसेचे गणेशोत्सवातील आवाज दरवर्षीप्रमाणे यंदाही क्षीण असणार आहेत. त्यांच्या निवडक पदाधिकार्‍यांच्या उत्सवात स्थानिक नेत्यांऐवजी मोदी-शहा-फडणवीस यांचेच फोटो दिसण्याची शक्यता आहे.

नगर महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी म्हणजे 2023 च्या डिसेंबरमध्ये आहे. त्यामुळे त्याआधीच्या 2023 मधील गणेशोत्सवात सगळ्यांचेच जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन अपेक्षित आहे. पण, यंदाचा गणेशोत्सव कोरोना सावटाची दोन वर्षे हटल्यानंतरचा पहिला निर्बंधमुक्त गणेशोेत्सव असल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर गणेशोत्सवाचे भव्य मंडप उभे राहिले आहेत. अर्थात अनेक मंडप भगव्या झालरींचे असले तरी त्यांच्यावर झळकणारे राजकीय नेत्यांचे फोटो परिसरातील वर्चस्व कोणाचे आहे, याचे द्योतक मानले जाते. या निकषात सध्या राष्ट्रवादी आघाडीवर आहे. बहुतांश मंडपांवर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीच छायाचित्रे झळकत आहेत. सावेडी, बालिकाश्रम रोड, बोल्हेगाव, केडगाव, सारसनगर या उपनगरांच्या परिसरात याचे प्रमाण जास्त आहे.

शिवसेनेला फुटीचा फटकानगर शहराचे तब्बल 25 वर्षे आमदार असलेले (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या काळात मध्य नगर शहरात व उपनगरांतूनही शिवसेनेचा बोलबाला होता. बहुतांश मंडपांवर त्यांचे फोटो झळकायचे. पण त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने शहर शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर मनपात आणलेली शिवसेनेची सत्ताही अनेकांना रुचलेली नाही. त्यामुळे सव्वा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मनपाच्या या सत्तेच्या काळापासूनच शहर सेनेत दोन गट पडले आहेत. त्यात भर म्हणजे आता राज्यातील ठाकरे सरकार जाऊन नवे शिंदेशाही सरकार आल्याने शिवसेनेतील काहींनी या नव्या गटाला साथ देणे पसंत केले आहे. त्यामुळे आता शहर शिवसेनेची एकत्रित ताकद अधिकृतरित्या विभागली गेली आहे. परिणामी, शिवसेना नगरसेवकांच्या गणेश मंडळांवरील नेत्यांचे फोटोही बदलण्याच्या मार्गावर आहेत. 

दुसरीकडे शहर काँग्रेसची स्थितीही फारशी वेगळी नाही. त्यांची संघटना एकीकडे व नगरसेवक दुसरीकडे असे चित्र आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मंडळांचे मंडप असले तरी तेथे राष्ट्रीय-राज्य वा स्थानिक काँग्रेस नेत्यांचे फोटो झळकण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना तेथे राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचेच फोटो लागतील, असेही आवर्जून सांगितले जात आहे. त्यामुळे त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या संघटनेकडे बडे मंडळ नसल्याने त्यांचाही यंदाचा गणेशोत्सव शक्तीप्रदर्शनाविनाच होणार आहे. भाजपचीही अशीच स्थिती आहे. भाजपचे बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीला मानणारे असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांच्या मंडपांवर राष्ट्रीय व राज्य नेत्यांची फोटो दिसण्याचीच जास्त शक्यता आहे. स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीशी त्यांची जवळीक असली तरी जाहीरपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटोे आपल्या मंडपात लावण्याची हिंमत मात्र कोणातही नाही. दरम्यान, मनसे, शिव राष्ट्र सेना व अन्य राजकीय पक्षांचे गणेशोत्सवही मोजकेच व त्यांच्या-त्यांच्या नेत्यांच्या फोटोंचे प्रदर्शन करणारे होण्याची शक्यता आहे.

मानाचे गणपती संमिश्र – माळीवाड्यातील मुख्य मानाचा गणपती विशाल गणराय हा शहरवासियांचे आराध्यदैवत आहे. मात्र, त्याच्याभोवतीचे माळीवाडा परिसरातील 11 गणपती मानाचे गणपती मानले जातात. या गणपती मंडळांवरही राजकीय नेतेमंडळींचे वर्चस्व आहे. मात्र, या 11पैकी प्रत्येकी चार शिवसेना व राष्ट्रवादीचे, दोन सर्वांना समवेत घेऊन चालणारे व एक भाजपचे मंडळ आहे. त्यामुळे आता मानाचे गणपती समजल्या जाणार्‍या संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ तसेच आदिनाथ, दोस्ती, नवजवान, समझोता, नीलकमल, शिवशंकर, कपिलेश्‍वर व नवरत्न या मंडळांच्या मंडपांवर कोणाचे फोटो झळकतात, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

COMMENTS