जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक नव्या गोष्टी उभ्या राहिल्या, त्याचे परिणाम जगातल्या अनेक देशातील अंतर्गत राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यावर उमट
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक नव्या गोष्टी उभ्या राहिल्या, त्याचे परिणाम जगातल्या अनेक देशातील अंतर्गत राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यावर उमटत गेले! सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘ मॅडम कमिशनर ‘ या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मीडियामध्ये त्यांनी पुस्तकात मांडलेल्या अनेक प्रकरणांवर चर्चा होत आहे. मात्र, या संदर्भात स्वतः मीरा बोरवणकर यांचे म्हणणं असं आहे की, *मुळातच माझ्या आत्मचरित्रातील पहिली चार-पाच प्रकरणे ही गाजतील, त्यावर चर्चा होईल, अशी मला अपेक्षा होती. परंतु, ज्या गोष्टींची दखलही घेतली जाणार नाही, अशा गोष्टींवर चर्चा होत आहे. मी आयपीएस अधिकारी म्हणून जो सुरुवातीला संघर्ष केला, ज्या पद्धतीने माझी जडणघडण झाली, त्यावर खरे तर चर्चा अनुषंगाने नुषंगाने महत्त्वाची होती. पण त्यावर कोणीही चर्चा करित नाही. याचा अर्थ मीरा बोरवणकर यांच्या आत्मचरित्रामध्ये ज्या गोष्टी सेलेबल आहेत, याची अचूक हेरणी पुस्तकाच्या प्रकाशन संस्थेने केली. त्यामुळेच या पुस्तकाला अधिक सेलेबल करण्यासाठी दररोज त्या पुस्तकातील वादग्रस्त विधाने प्रस्तुत करून, त्यावर वादविवाद घडवून चर्चा घडवली जाते. पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी एक बाजारपेठीय तंत्र म्हणून नव्याने विकसित केलेल्या या तंत्राचा वापर पुन्हा एकदा एका सेवानिवृत्त आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रासाठी केला जातो आहे, ही बाब नव्या जागतिकीकरणाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. पूर्वी जेव्हा कोणतीही प्रकाशन संस्था पुस्तके प्रकाशित करायची, त्यावेळी त्या पुस्तकांचा वैचारिक आशय चर्चेला आणला जायचा. परंतु जागतिकीकरणानंतर उदयास झालेल्या प्रकाशन संस्थांनी पुस्तकाचा वैचारिक गाभा किंवा असो हा टाकाऊ समजला आणि पुस्तकाच्या तपशीलातच जाऊन त्यावर चर्चा घडवून वादग्रस्तता पुढे आणून त्या पुस्तकाची विक्री वाढविण्याचे तंत्र जोपासले जाते! हीच बाब सध्या मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रासंदर्भात होत आहे. एकंदरीत जागतिकीकरणानंतर समाजातील चळवळी हरवल्या. चळवळी हरवल्यानंतर त्याचे वैचारिक अधिष्ठानही हरवले. आज समाज व्यवस्था विचारविहीन पातळीवर नेण्याचं काम, अनेक घटकांकडून केलं जात आहे. तसंच, पुस्तक प्रकाशन सारख्या वैचारिक क्षेत्रात वावरणाऱ्या संस्थांकडूनही केले जात आहे, ही या निमित्ताने सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे; हे या ठिकाणी नमूद करायला हवे. सध्या कॉर्पोरेट लेवलची पुस्तक विक्रीची दुकाने शहरांमधून जागोजाग आपल्याला दिसून येतात. रस्त्याच्या किनारी देखील अनेक पुस्तकांचे ढीग विक्रीसाठी उपलब्ध असताना आपल्याला दिसतात. पुस्तके त्याच्यातील वैचारिक आशय असल्यामुळे विकले जातात असे नाही, तर त्या पुस्तकांमधून असलेला तपशील हाच सर्वात अधिक विक्री योग्य तपशील केला जातो. यात व्यावसायिक हित दडलेले आहे. कोणत्याही पुस्तकाच्या तपशीलात जाऊन त्यातील वादग्रस्त मुद्दे बाहेर काढून, ते चर्चेला आणणे आणि त्या पुस्तकाची अधिक विक्री होईल, यादिशेने प्रयत्न करणे, हेच काम प्रकाशन संस्था करताना दिसतात! थोडक्यात सांगायचे झाल्यास नव्या काळातील प्रकाशन संस्था या पुस्तकाचा आशय आणि विचार यापेक्षाही तपशिलावर अधिक भर देतात. वादग्रस्त तपशील चर्चेला आणतात. त्यातून पुस्तक विक्रीचा खप लाखांनी मिळवतात. हा सगळा प्रकार पुस्तकातील विचार पसरवणारा नसून पुस्तकातून आर्थिक कमाई करणारा नवा भांडवली विचार आहे. त्यामुळे आजच्या काळात पुस्तक लिहिणारे लेखक, विचारवंत हे अशा व्यावसायिक प्रकाशन संस्थांच्या हाताखालील केवळ बाहुले बनले आहेत.
COMMENTS