Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षण सरकारकडून कमकुवत केले ः प्रकाश शेंडगे

लातूर : राज्य शासनाने विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का देण्याचे काम केले असून, ओबीसी समाजाचे हक्क पद्धतशीरपणे कमी केले जात आहे

कुंभार समाजाकडून केला जबरदस्तीने दंड वसूल
लातूर महापौर निवडणुकीत काँग्रेस-वंचितमध्ये तणाव
नवोदय विद्यालयात सहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लातूर : राज्य शासनाने विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का देण्याचे काम केले असून, ओबीसी समाजाचे हक्क पद्धतशीरपणे कमी केले जात आहेत, असा गंभीर आरोप ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला. लातूर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठक व पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील ओबीसी समाजाला स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय व्यासपीठ मिळावे, यासाठीच ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचे ‘वस्त्रहरण’ सुरू असल्याची भावना समाजात असून, त्यावरचा एकमेव प्रभावी उपाय म्हणजे सत्तेत सहभाग मिळवणे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजवर विविध राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला, असा आरोप करत शेंडगे म्हणाले की, तथाकथित ओबीसी नेत्यांचे जातप्रमाणपत्रे जात पडताळणी समितीसमोर तपासणीसाठी उघड केली जातील. एखाद्या प्रकरणात प्रमाणपत्र वैध ठरले, तरी त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये यंदा अभूतपूर्व प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचे दिसून आले असून, ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे शेंडगे यांनी नमूद केले. निवडणूक लढवू इच्छिणार्‍या अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना एबी फॉर्मही मिळू दिले गेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले तरी ओबीसी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आता ओबीसी बहुजन आघाडीची संघटित ताकद उभी राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पक्षामार्फत घरपोच एबी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ओबीसी बहुजन आघाडी सक्रियपणे सहभागी होणार असून, ज्या ठिकाणी पक्ष उमेदवार देणार नाही, तेथे मूळ ओबीसी उमेदवारांना पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठी मर्यादित वेळ दिला जात असल्याचा प्रकार दबावाखाली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS