अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील लॉकडाऊनमध्ये देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला, कामगारांना हजारो किलोमीटर पायी चालत जावे
अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील लॉकडाऊनमध्ये देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला, कामगारांना हजारो किलोमीटर पायी चालत जावे लागले. व्यापार व कारखानदारी ठप्प झाली, अनेकजण कर्जात बुडाले. तसेच, कोविड नियंत्रण यंत्रणेत मोठे भ्रष्टाचार झाल्याचेही नंतर उघड झाले आहे. आता कुठे उद्योग-व्यवसाय सुरळीत होऊ पाहत असताना अशात पुन्हा लॉकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल व देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पार्टी लॉकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल, असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.
चीनसहित इतर काही देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर घनवट यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. लॉकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असल्यामुळे स्वतंत्र भारत पार्टीने पहिल्यापासूनच सक्तीच्या लॉकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने जर पुन्हा अशा निरुपयोगी, त्रासदायक व नुकसानकारक लॉकडाऊनची घोषणा केली तर स्वतंत्र भारत पार्टी त्याला जाहीर विरोध करेल व स्वतःची काळजी घेत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करणार आहे. पुन्हा लॉकडाऊन न करण्याबाबतचे विनंतीपत्रही आरोग्य मंत्रालयाला देण्यात येणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे की, ज्या देशांमध्ये कडक लॉकडाऊन पाळले गेले, तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे व तेथील अर्थव्यस्थेवर अनिष्ट परिणाम झाले आणि लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्या देशांनी लॉकडाऊन पाळले नाही, त्यातील स्वीडनमध्ये कोविड काळात मृत्युदर लॉकडाऊन करणार्या देशांपेक्षा कमी आहे. कोविड महामारी, स्पॅनिश फ्लू पेक्षा 50 ते 500 पटीने कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे, असेही घनवट यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरीयंट जगभर झपाट्याने पसरतो आहे व मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत, असा खोटा प्रचार व प्रसार माध्यमात जोर धरत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे
COMMENTS