Homeताज्या बातम्यासंपादकीय

अहिल्या नव्हे, अहल्यादेवी होळकर ! 

महाराष्ट्राच्या मध्यभागी अतिशय सुपीक आणि सहकार चळवळीची भरभराट असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. या अहमदनगर जिल्ह्याचे आता नामांतर पुण्यश्लोक अहिल्याद

ओबीसी : राजकीय आरक्षण, जातनिहाय जणगणना ऐरणीवर ! 
माहीतीचा कायदा दुर्लक्षित होतोय ! 
काचेचे घर आणि दगडफेक ! 

महाराष्ट्राच्या मध्यभागी अतिशय सुपीक आणि सहकार चळवळीची भरभराट असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. या अहमदनगर जिल्ह्याचे आता नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे केले जात आहे. याबद्दल निश्चितपणे स्वाभिमान वाटतो. परंतु, राज्य सरकारला एक आमची सूचना राहील की, जिल्ह्याचं नाव बदलताना त्याच्यातील व्याकरण शद्धता जोपासायला हवी. त्यामुळे राज्य सरकार ला आमची सूचना राहील की, त्यांनी नगर जिल्ह्याचे नाव ठेवताना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर असे ठेवले पाहिजे. खरे नाव व्याकरण शुद्ध जे आहे, ते अहिल्या नसून अहिल्या आहे. अहल्यादेवी होळकर या देशातल्या अशा राणी आहेत की, ज्यांनी स्वातंत्र्य, समता आणि न्याय यावर आधारलेली राज्यव्यवस्था चालवली. नर्मदाकिनारी मध्य प्रदेश मध्ये वसलेल्या महेश्वर या त्यांच्या राजधानीला जर आपण भेट दिली तर, एक राज्यकर्त्या म्हणून त्यांच दोन पैलू आपल्या नजरेस ठसठशीतपणे दिसतात. त्यातील पहिला पैलू  म्हणजे त्या उत्कृष्ट अशा राज्यकर्त्या आणि त्याचबरोबर कला-संस्कृती जोपासणाऱ्या आणि अतिशय उत्तम उद्योजिका, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. अहल्यादेवी होळकर हे नाव जिल्ह्याला देत असताना त्यांची धार्मिक प्रतिमा ही फार मोठी करण्याऐवजी, त्यांची समतावादी राज्यकर्ते आणि अतिशय उत्तम उद्यमशील उद्योजक, ही त्यांची प्रतिमा नगर जिल्ह्यामध्य निर्माण करण्यात आली तर ऐतिहासिक दृष्ट्या ते निश्चितच उपकारक राहील. कारण, नगर जिल्हा हा सहकार चळवळीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या भरभराटीला आला असला तरी, सामाजिक अत्याचाराच्या अनुषंगाने तो महाराष्ट्रामध्ये सातत्याने वादग्रस्त ठरला आहे.

अशा या जिल्ह्यामध्ये अहल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक न्यायाची भूमिका आणि त्याचबरोबर उद्योग निर्माण करून रोजगार निर्मितीची भूमिका, या दोन ऐतिहासिक पैलूंना जर नगर जिल्ह्यामध्ये ठसठशीतपणे रेखाटण्याचे कार्य, राज्य सरकारने केलं तर, ते निश्चितपणे स्वागतार्ह आहे. खरेतर माहेश्वर येथे आजही आपण भेट दिली तर,  तलम रेशमी साड्या ज्या आजही घडी करून आगपेटीच्या अगदी लहानशा खोक्यामध्ये ठेवता येईल, इतक्या त्या कलाकुसरीच्या साडीचे वैशिष्ट्य जगभरात आहे. अहल्यादेवी या जमिनीच्या वाटपात देखील समान न्यायाची भूमिका नेहमीच घेत. त्यांच्या राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये आदिवासी समुदायाला त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आणि त्या जमिनीवर शेतसारा वसूल करण्याचा अधिकारही त्यांनी नियुक्त केलेल्या आदिवासी अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या राज्यसत्तेच्या कार्यकाळातील त्यांचा इतिहास जर पाहिला तर, अभिमानाने आपली मान उंचावल्याशिवाय राहत नाही. त्यांनी युद्ध रणनीती, मुत्सद्दीपणा, उद्योग उभारणी, कला-संस्कृती आणि किल्ले उभारणी, त्याचबरोबर जमिनीचे समान वाटप या विविध क्षेत्रांमध्ये समता मुलक काम केले आहे. त्यांच्या कार्याला कुठेही तोड नाही. महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात जन्म झालेल्या अहल्यादेवी होळकर यांनी मध्य भारतात जाऊन आपला जो ऐतिहासिक राज्यकारभार केला, त्याला या देशाच्या इतिहासात स्त्री राज्यकर्ता म्हणून कधीच तोड नाही. अहल्यादेवी होळकर यांना नुसतच धर्मामध्ये बंदिस्त करणं, हे त्यांच्यावर प्रचंड अन्याय करण्यासारखे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू जे आहेत ते निर्मितीक्षम आहेत. अनेक किल्ल्यांची, उद्योगांची, सांस्कृतिक क्षेत्राची कला-कौशल्यांची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता.  नेतृत्व म्हणून त्यांनी या सगळ्या क्षेत्रांमध्ये एक प्रमाण ठराव, असं काम केलें आहे. त्यांच्या इतिहासाची नोंद घेताना त्यांच्या या निर्मिती कार्याची अधिक नोंद घेतली गेली पाहिजे. त्यांची प्रतिमा केवळ एक धर्मपूजक म्हणून एवढी बंदिस्त न करता, त्यांचे खरे व्यापक स्वरूप एक राज्यकर्त्याचे आहे आणि ते राज्यकर्त्याचे स्वरूप जनतेसमोर प्रकट करण्यासाठी त्यांच्यावर निर्माण झालेलं साहित्य आणि त्यांनी केलेलं कार्य, यावर राज्य सरकारने साहित्याच्या माध्यमातून त्यावर प्रकाश पाडायला हवा. राज्य सरकारने स्वतंत्र प्रकाशन विभाग सुरू करावा, हेच त्यांना अभिवादन ठरेल!

COMMENTS