Homeताज्या बातम्यासंपादकीय

हॅम्लेट, नटसम्राट अन् शरद पवार !

आपण दचकला असाल कदाचित! हॅम्लेट, नटसम्राट ही नाटकांची, नव्हे तर, शोकांतिकांची नावे.‌ त्यानंतर शरद पवार हे नाव येते. खरेतर, शरद पवार यांना यशवंतराव

लोकशाहीतील दुबळ्या झोळ्या !
पवारांचे वक्तव्य, हरियाणातील घडामोडी समानार्थी !
जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

आपण दचकला असाल कदाचित! हॅम्लेट, नटसम्राट ही नाटकांची, नव्हे तर, शोकांतिकांची नावे.‌ त्यानंतर शरद पवार हे नाव येते. खरेतर, शरद पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा असल्याचे महाराष्ट्रात मानले जाते. त्रिभाषा सूत्राचे संयोजक आणि समर्थक असलेले यशवंतराव चव्हाण यांचा साहित्यावरचा अभ्यासही दांडगा होता. तोच वारसा जपणारे शरद पवार साहित्य, इतिहास अशा सर्वच क्षेत्रात वावरत असतात. त्यामुळे, हॅम्लेट, नटसम्राट या नावांचा अर्थ त्यांना सार्थपणे कळणार. हॅम्लेट आणि नटसम्राट ही दोन्ही नाटके म्हणजे शोकांतिका इंग्रजी आणि मराठी भाषांमधून असले तरी त्यांचा आशय सारखाच आहे. मानवी मन हे प्रेम, भावनिकता, जिव्हाळा, विश्वास, श्रध्दा अशा विविध भावभावनांचा कल्लोळ असतो. याच भावना सुख,दु:ख, आनंद, कृतज्ञता निर्माण करतात. अर्थात, त्याबरोबरच त्या माणसात कृतघ्नपणाही तितकाच मुरलेला दिसतोच. 

       हॅम्लेट हे भाषिक, भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या लांबचे ठरते.‌ नटसम्राट हे नाटक बहुजन समाजात तसे रूजणारे नाही. कारण पोटची मुलगीच बापाला चोर ठरविते; ज्याचे आख्खे आयुष्य रंगभूमी गाजवण्यात गेलेले असते.‌ मुलीच्या आरोपाने आपलं सर्वस्वी गमावल्याची भावना निर्माण झालेला नटसम्राट हा आपला स्वाभिमान गमावत नाही! 

   ‌‌शरद पवार हे नाव आख्ख्या महाराष्ट्राला नाचवणारे आणि आपल्या सामर्थ्याने आकार देणारे नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ऐन तारुण्यात त्यांनी पदभार सांभाळला. अनेक पक्षांना एकत्रित आणून राज्याची धुरा सांभाळणारे शरद पवार यांनी काळाप्रमाणे आपला राजकीय वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांना जसा आपला राजकीय वारसा म्हणून पुढे केले; तोच कित्ता शरद पवार यांनी गिरवला आणि सुधाकरराव नाईक यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले होते. परंतु, त्यानंतर या दोन्ही नेत्यांचे सुर बिघडले. सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारून शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळातून थेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकीय वारसा बनविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. दुधाने तोंड पोळलं की, माणूस ताकही फुंकून पितो. आपल्या कुटुंबातील राजकीय वारसा पुढे करताना म्हणून त्यांची घालमेल होत राहिली. त्यातून अजित पवार यांना कधी पक्षाध्यक्ष, तर कधी उपमुख्यमंत्री आणि कधी मंत्री असा राजकीय वारसा म्हणून पसारा दिला. पण, याबरोबरच अजित पवार यांच्या प्रत्येक टग्यापणाच्या खोड्या त्यांनी पदरात घेतल्या. आपण दिलेल्या संधी विश्वातून उभे राहिलेले अजित पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू करून ठेवले. याचा नेमका फायदा राजकीय वारसा घेणारच हे कुणा जोशीबुवाने सांगण्याची गरज नाही.‌ शरद पवारांनी दिलेल्या प्रत्येक संधीला आपल्या सांपत्तिक विश्वाची वाढ करविण्यात रूपांतर केलेले अजित पवार यांना कोणत्यातरी सत्तेचा आच येईल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण, झालं. संपत्ती वाचविण्यासाठी स्वाभिमान शून्य सत्तेत गेलेले अजित पवार आपल्या काकांशी इतका मोठा पंगा घेतील, हे स्वप्नवतच वाटावे. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले पितासमान काकांना एकट्याने सोडून देतील हे समजू शकलो असतो; परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाला ‘भटकती आत्मा’ म्हणूनही लाडक्या पुतण्याला त्याचं जराही वाईट वाटू नये; याऊलट, भटकती आत्मा कोणाला म्हटलं हे मी मोदींना विचारीन, अशी मखलाशी करणारे अजित पवार यांचे सत्तालालसेचे वर्तन हीच शरद पवार यांच्या आयुष्यातील खरी शोकांतिका आहे!

COMMENTS