लोकसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये पायाखालची भूमी हलत असलेल्या, भारतीय जनता पक्षाला एनडीए आघाडी मधील सहकारी घटक दल वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लाग
लोकसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये पायाखालची भूमी हलत असलेल्या, भारतीय जनता पक्षाला एनडीए आघाडी मधील सहकारी घटक दल वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. ही कसरत करताना कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान आहे किंवा त्यांची काय शक्यता आहे, हे देखील पाहिले जात नाही. केवळ इंडिया आघाडीपेक्षा आमच्याकडे अधिक राजकीय पक्ष आहेत, हे एक परसेप्शन निर्माण करून, त्या आधारे मतदारांच्या मानसिकतेला आव्हान करून मत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, वस्तुस्थिती पाहता हीच गोष्ट आता त्यांच्यावर बुमरॅंग होऊ लागली आहे. काल दिल्लीला विशेष विमानाने बोलवल्या गेलेले मनसेचे राज ठाकरे यांच्याशी मोदी-शहा यांचे निवडणूक मिलन झाल्याने, खासकरून उत्तर भारत प्रांतामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश, या दोन राज्यांमध्ये विरोधात आवाज घुमला. यात उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकांनी राज ठाकरे हे उत्तर भारतीयांना केवळ शिवीगाळच करत नाही, तर, त्यांच्यावर शारीरिक हल्ले देखील करतात, असा आरोप केला. त्यामुळे त्यांना सोबत घेतल्यामुळे विशेषता गाय पट्टा म्हटला जाणारा प्रांत, भारतीय जनता पक्षापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील परप्रांतीय मतदार आता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हे मतदार देखील काही प्रमाणात दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला मनसेला अवघे एक टक्का किंवा त्यापेक्षाही कमी मतदान असताना त्यांची गरज भारतीय जनता पक्षाला नेमकी का पडली, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. या निवडणुकीच्या मिलनातून राज ठाकरे यांनी दोन जागा पदरात पाडून घेण्याची मुत्सद्देगिरी केली. परंतु, त्यांना एकही जागा न देता राज्यात प्रचारामध्ये त्यांना स्टार प्रचारक म्हणून सामावून घेण्यात आले आहे. अर्थात, स्टार प्रचारक म्हणून वावरताना त्याची काही किंमत निश्चितपणे राज ठाकरे वसूल करतील. ती कुठल्या स्वरूपात असेल हे आत्ताच सांगता येत नाही. परंतु, त्यांच्या राजकीय ध्येय धोरणाचा तो भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका होत असताना छोटे-मोठे अनेक पक्ष भाजपाच्या इंडिया आघाडीमध्ये सामील होत असले, तरीही या आघाडीमध्ये सामील होणारे पक्ष हे काँग्रेसचे मत घेणारे नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या मतदानात कपात करण्याचा जो हेतू यामध्ये दिसतो, त्यात फारशी सफलता किंवा फारसं यश भारतीय जनता पक्षाच्या हाती लागणार नाही. अशा वेळी जे काही मतदान असेल ते भारतीय जनता पक्षाचेच कापले जाईल, असे फार तर दिसते. राज्यात अनेक नवीन पक्ष उमेदवारांची घोषणा करीत आहेत. अशा वेळी ते उमेदवार जी मतं घेतील ती पारंपारिक काँग्रेसची नाहीत. कारण काँग्रेसची परंपरागत वोट बँक त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी उध्वस्त केली आहे. परंतु, आता नव्याने जे राजकीय समीकरण देशात निर्माण झाले आहे, ते पाहता काँग्रेसच्या विषयी एक सॉफ्ट कॉर्नर मतदारांमध्ये निर्माण झाला आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या मतदानात आता कपात होण्याऐवजी त्यात वाढ होईल. त्यामुळे इंडिया आघाडीच्या विरोधात जे काही सुरू आहे, ती फसण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका अतिशय चुरशीच्या आहेत असं जरी म्हटलं जात असलं, तरीही महाराष्ट्राच्या मतदारांची मानसिकता पाहता ही निवडणूक कदाचित महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकतर्फी होईल का, असाच कयास जणू लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतु, महाराष्ट्राची पार्श्वभूमी पाहता इथे विचारांच्या अनुषंगाने मतदान नेहमीच घडत आले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही वैचारिक प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीत निश्चित राहील.
COMMENTS