Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीची वाटचाल समेटाच्या दिशेने

अजित पवारांनी सलग दुसर्‍या दिवशी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यामुळे पक्षात अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार असे दोन गट पडले

अहमदनगर शहरात स्वच्छतेचा बोजवारा… कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा
स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना नवनीत राणा भावुक
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यामुळे पक्षात अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार असे दोन गट पडले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर 8 मंत्र्यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर पुन्हा सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपल्या 30 आमदारांसह शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीची वाटचाल समेटाच्या दिशेने सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सलग दुसर्‍या दिवशी अजित पवारांसह त्यांच्या सहकारी मित्रांनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदारांनी पवारांची भेट घेतली. विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर अजित पवार व त्यांचे आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. तेव्हा शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी होते. तेथून ते थेट वाय बी सेंटरमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी अजित पवार व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. जवळपास तासभर हा संवाद सुरू होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार यांच्या गटाची आज वाय बी सेंटरवर बैठक होती. या बैठकीसाठी त्यांचे आमदार जमले होते. पण या बैठकीपूर्वीच अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार वाय. बी. सेंटरवर पोहोचले. या घटनाक्रमाची शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी वाय बी सेंटरवर पोहोचताच जितेंद्र आव्हाडांकडे या ठिकाणी पत्रकार का पोहोचले? याची माहिती घेतली. या घडामोडीमुळे जयंत पाटील यांनी आपल्या आमदारांना प्रदेश कार्यालयात जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या आमदारांसोबत तासभर चर्चा करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीची वाटचाल समेेट आणि एकसंध राहण्याच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर शरद पवारांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शरद पवार बॅकफूटवर जाणार का? राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? झाला तर तो कशा पद्धतीने असेल? शरद पवार भाजपसोबत जाणार का? की शरद पवार पक्षावरील दावाही सोडणार? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतांना दिसून येत आहे.

शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक – यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये बैठक झाली. त्यात बंडखोर गटाने शरद पवारांची सोबत येण्यासाठी समजूत काढली. या ठिकाणी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व रोहित पवारही उपस्थित होते. पण त्यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही, मात्र यावरून पक्षामध्ये लवकरच समेट होण्याची शक्यता दिसून येत आहे.

COMMENTS