नांदेड । प्रतिनिधी मालेगाव येथील प्रगतिशील शेतकरी व कृषिभूषण भगवान इंगोले यांना विषमुक्त व नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दै. लोकपत्र
नांदेड । प्रतिनिधी
मालेगाव येथील प्रगतिशील शेतकरी व कृषिभूषण भगवान इंगोले यांना विषमुक्त व नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दै. लोकपत्रच्या वतीने कृषिरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयपीएस शशांक गौड, कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक तसेच आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. दि. 9 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील एम.जी.एम. महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात विषमुक्त नैसर्गिक शेती, सेंद्रिय उत्पादन आणि शाश्वत कृषी पद्धतींचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल भगवान इंगोले यांना हा सन्मान बहाल करण्यात आला. कार्यक्रमास कृषीप्रेमी, पत्रकार आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैसर्गिक शेतीचा व्यापक उपक्रम
यावेळी बोलताना कृषिभूषण भगवान इंगोले यांनी सांगितले की, हा पुरस्कार केवळ वैयक्तिक नसून नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणार्या सर्व शेतकर्यांचा सन्मान आहे. आम्ही शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून शंभर शेतकर्यांना एकत्र आणले असून ‘अपेडा’ अंतर्गत ऑरगॅनिक सर्टिफिकेशन प्राप्त केले आहे. सेंद्रिय अन्नधान्य निर्मिती, शेतावरच नैसर्गिक औषधांची निर्मिती, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतकर्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर मिळवून देणे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी तत्त्वज्ञान आणि उद्दिष्ट
विषमुक्त भाजीपाला व धान्य उत्पादन, ग्राहकांना सुरक्षित अन्नपुरवठा, भूमातेचे संवर्धन आणि पर्यावरण संतुलन हेच आपल्या नैसर्गिक योगिक शेतीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे शाश्वत कृषी व्यवस्थेला चालना मिळून शेतकरी आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही कामगिरी नांदेड जिल्ह्यातील नैसर्गिक शेती आंदोलनासाठी प्रेरणादायी ठरत असून भविष्यात अधिक शेतकरी सेंद्रिय व विषमुक्त शेतीकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS