Homeमहाराष्ट्रराजकारण

विकसित नांदेडचा जाहीरनामा की जुन्याच अपयशांचा पुनरुच्चार ?

भाजपच्या विकास नार्‍यावर जनतेचे प्रश्‍नचिन्ह?खा. अशोकराव चव्हाण यांच्या भ्रामक विकासाच्या कल्पनांना नांदेडकर पुन्हा भुलणार ?नांदेड ःविकसित भारत, व

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’

भाजपच्या विकास नार्‍यावर जनतेचे प्रश्‍नचिन्ह?
खा. अशोकराव चव्हाण यांच्या भ्रामक विकासाच्या कल्पनांना नांदेडकर पुन्हा भुलणार ?
नांदेड ःविकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड या घोषणेसह भारतीय जनता पक्षाने नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपला जाहीरनामा सादर केला आहे. इंदूर पॅटर्नचा दाखला देत स्वच्छता, पर्यावरण, पायाभूत सुविधा, उद्याने, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, सुशोभित रस्ते अशा आकर्षक वाक्यांनी हा जाहीरनामा सजवण्यात आला आहे. मात्र या घोषणांचा मागोवा घेतला असता नांदेड शहराची आजची वास्तव परिस्थिती पाहून हा जाहीरनामा वचननामा आहे की फसवनामा असा थेट सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यात इंदूर शहराचा आदर्श म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. इंदूर हे स्वच्छता, नियोजन, पर्यावरण संवर्धन आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत देशात अव्वल स्थानी आहे, याबाबत दुमत नाही. मात्र याच निकषांवर नांदेड शहर आज कुठे उभे आहे, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. गेल्या 10-15 वर्षांत नांदेडसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध झाला. विशेषतः तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात  गुरुता- गद्दी  योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला होता. त्या काळात महानगरपालिकेची सूत्रे काँग्रेसकडे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडेच होती. मात्र त्या निधीचा दर्जेदार वापर झाला का, हा प्रश्‍न आजही शहरवासीयांच्या मनात आहे. त्या काळात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, सुशोभीकरण यांची कामे घाईघाईत आणि निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप सातत्याने होत आहे. कोट्यवधींची कामे काही महिन्यांतच उखडलेली दिसली, सिमेंट काँक्रीटचे रस्ते पुन्हा खोदले गेले, ड्रेनेजची कामे अपूर्ण राहिली. आज त्याच काळातील काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये आले असून पुन्हा विकासाचा नारा देत आहेत. काल जे अपयशी ठरले, ते आज कसे यशस्वी ठरणार, हा थेट सवाल जनतेकडून केला जात आहे.
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील शेतकरी पुतळ्याची आजची अवस्था ही विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे करणारी आहे. हा पुतळा शहराच्या प्रवेशद्वारावर असूनही त्याची देखभाल नाही, परिसराची दुरवस्था आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांनी या मार्गाने ये-जा करताना एकदा तरी या पुतळ्याकडे पाहावे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. शहरातील मोर चौकाचे परशुराम चौक म्हणून नामकरण करण्यात आले. मोठ्या थाटात घोषणा झाल्या, परशुराम बसविण्याचे भूमिपूजन जाहीर झाले, उद्घाटन फलक लावण्यात आला. मात्र आज त्या चौकात नेमके आहे तरी काय, हेच अनेक शहरवासीयांना ठाऊक नाही. परशुराम कुठे गेला, उद्घाटनाचा फलक कुठे गायब झाला, याची साधी माहितीही उपलब्ध नाही. या चौकाचा विकास करणारे नगरसेवक पुढील निवडणुकीत प्रभाग बदलून, चिन्ह बदलून मैदानात उतरले आहेत. अशा लोकांकडून शहराचा विकास होईल का, हा प्रश्‍न सामान्य मतदार विचारत आहे.
जाहीरनाम्यात वॉकिंग ट्रॅक, उद्याने, ओपन जिम, रस्त्यांचे सौंदर्यीकरण अशा अनेक स्वप्नवत कल्पना मांडण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात नांदेडमधील रस्त्यांची अवस्था विदारक आहे. अनेक ठिकाणी डिव्हायडर उखडलेले आहेत, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, स्ट्रीटलाइट्स नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी ज्या परिसरात राहतात, तिथेही रात्री अंधार असतो, याकडे विकास पुरुषांचे लक्ष नाही, ही बाब अधिकच बोलकी आहे.

COMMENTS