नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे

5 लाखावरील ठेवींचा प्रश्‍न कायम

अहमदनगर/प्रतिनिधी : आर्थिक अडचणीत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या 5 लाखापर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे सर्व पैसे डिपॉझीट इ

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात
चार जागा बिनविरोध झाल्याचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष
बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…

अहमदनगर/प्रतिनिधी : आर्थिक अडचणीत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या 5 लाखापर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे सर्व पैसे डिपॉझीट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन देणार असले तरी हे पैसे नंतर डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशन नगर अर्बन बँकेकडून व्याजासह वसुल करणार आहे. त्यामुळे एकीकडे ठेवीदारांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे बँकेवर बरखास्तीची टांगती तलवार असणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत दिल्या जाणार असल्या तरी पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी संबंधित ठेवीदारांना परत कधी मिळणार, हा प्रश्‍न कायम आहे.
नगर अर्बन बँकेच्या माजी व बरखास्त संचालक मंडळाचे समर्थक पुन्हा बँकेवर निवडून आल्यावर चार दिवसातच रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या दैनंदिन कामकाजावर निर्बंध लावले. त्यांना महिनाही होत नाही तोच डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बँकेमध्ये 5 लाखापर्यंत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना दिलासा देताना त्यांचे पैसे येत्या तीन-चार महिन्यात परत करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. पण यामुळे ठेवीदारांना समाधान असले तरी बँकेच्या अस्तित्वाचे काय, बँक अन्य कोणत्या बँकेत विलिन होणार की अवसायनात निघणार व 5 लाखावरील ठेवींचे काय, असे अनेक प्रश्‍न सभासदांतून उपस्थित होत आहे. अर्थात बँकेच्या संचालक मंडळाद्वारे वा प्रशासनाद्वारे त्याबाबत खुलासे होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे व ते सोशल मिडियात चर्चेचे झाले आहे.

नव्या बदलाचा फायदा
डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे ठेवींचे पैसे परत देण्याच्या सुरू केलेल्या प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी म्हणाले, 30 जुलै 2021 ला केन्द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत दि डिपॉझीट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट 1961 मध्ये एक महत्वपूर्ण सुधारणा करणारे विधेयक आणले होते. केन्द्रीय मंत्री मंडळ बैठकीत झालेली चर्चा व निर्णयाप्रमाणे ही सुधारणा सुचविण्यात आली होती. कोणतीही बँक आर्थिक शिस्त बिघडल्यामुळे अडचणीत आली व त्या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 प्रमाणे ठेवीदारांना ठेवी काढण्यास निर्बध घातले तर निर्बंध घातल्याच्या दिवसापासून 90 दिवसात ठेवीदारांना रुपये पाच लाखापर्यंतची रक्कम डिपॉझीट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनने द्यायची, अशी सुधारणा करण्यात आली व याच सुधारणेला अधीन राहून नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखापर्यत रक्कम 90 दिवसात परत मिळणार आहे. यातील पहिले 45 दिवस संबंधित ठेवीदाराची माहिती गोळा करणे व नंतरचे 30 दिवस त्या माहितीची तपासणी करून माहिती अधिकृत असल्याची खात्री झाल्यानंतर पुढील 15 दिवसात पैसे परत करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी संबंधित ठेवीदाराला मागणी अर्जासोबत केवायसी डॉक्युमेंट व दुसर्‍या बँकेतील खात्याचे डिटेल्स द्यायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

व्याजासह करावे लागणार परत
नगर अर्बन बँकेची आर्थिक शिस्त बिघडल्यामुळे दि 6/12/2021 ला बंधने आली होती. त्यानंतरचे 45 दिवस म्हणजे 19 जानेवारी 2022 पर्यंत ठेवीदारांनी मागणी अर्ज करायचे आहेत व दि. 5 मार्च 2022 पर्यंत ठेवीदारांना त्यांनी दिलेल्या खातेनंबरमध्ये पैसे जमा होतील, असे सांगून गांधी म्हणाले, ठेवीदारांना मिळणारी ही रक्कम नगर अर्बन बँकेला डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनला व्याजासह परत करायची आहे. ती किती दिवसात परत करायची याचा कालावधी कॉर्पोरेशनचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ठरविणार आहेत. ठरवलेल्या मुदतीत नगर अर्बन बँकेने हे पैसे परत केले नाही तर 2% दंड व्याजाचा भूर्दंड नगर अर्बन बँकेला लागणार आहे. तसेच जोपर्यत कॉर्पोरेशनचे पैसे परत जात नाहीत, तोपर्यत नगर अर्बन बँकेला इतर कोठलेही कर्जवाटप करता येणार नाही व मोठे खर्च करता येणार नाहीत, असेही गांधींनी स्पष्ट केले.

संचालक मंडळावर जबाबदारी
नगर अर्बन बँकेची रखडलेली वसुली करण्याचे मोठे दिव्य नगर अर्बन बँकेच्या विद्यमान संचालकांना पार पाडावे लागणार आहे. त्यांनीच वाटलेली कर्जे आहेत व ती थकीत आहेत. त्यामुळे डिपॉझीट कॉर्पोरेशनचे पैसे परत करण्याबरोबर ठेवीदार व खातेदारांचे पाच लाखापुढील पैसे देखील संचालक मंडळालाच परत करायचे आहेत. पण, नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे पूर्वीचे कारनामे रिझर्व्ह बँकेला चांगलेच माहीत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेची बारीक नजर या संचालकांवर राहणार आहे. या संचालकांच्या कारनाम्यांमुळेच आज नगर अर्बन बँकेसारख्या वैभवशाली बँकेला डिपॉझीट गॅरंटी कार्पोरेशनकडून उसनवारी करायची वेळ आली आहे. पण, बँक बचाव समितीला एका गोष्टीचे नक्कीच समाधान आहे की सतत जागरूकपणा व रिझर्व्ह बँकेशी सततचा संपर्क यामुळे नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना कुठलेही आंदोलनवा उपोषण न करता ठेवी परत मिळणार आहे, असेही गांधींनी आवर्जून स्पष्ट केले.

पाच लाखापुढील ठेवींचे लक्ष्य
बँक बचाव समिती भविष्यात देखील जागरूक व रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात राहणार आहे, असे स्पष्ट करून माजी संचालक गांधी यांनी स्पष्ट केले की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉर्पोरेशनने ठेवीदारांचे पैसे परत केले म्हणजे नगर अर्बन बँक बंद पडणार असा कोणी विचार करत असेल तर ते शक्य नाही. बँक बचाव समिती शेवटपर्यंत किल्ला लढवणार आहे व रिझर्व्ह बँकेच्या चीफ जनरल मॅनेजर पदावर नगर अर्बन बँकेविषयी विशेष स्नेह असलेल्या श्रीमती उमाशंकर व त्यांची टीम कार्यरत आहे, तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. पाच लाखापर्यंतचा प्रश्‍न मिटला असून, आता लक्ष्य पाच लाखापुढील ठेवी मिळण्याबरोबरच बँक सुरळीत होण्याचे आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS