नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेची निवडणूक अखेर होणार आहे. बँक बचाव पॅनेलने आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेची बिनविरोध निवडणूक

बनावट सोने प्रकरणातील 160 जणांना पकडण्याचे शेवगाव पोलिसांसमोर आव्हान
नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे
चार जागा बिनविरोध झाल्याचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेची निवडणूक अखेर होणार आहे. बँक बचाव पॅनेलने आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेची बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चक्क माघार घेतली आहे. पण जास्तीच्या सात अर्जांमुळे ही निवडणूक आता होणार आहे व बँक बचाव पॅनेलचे बिनविरोध सूर बासनात गुंडाळले गेले आहेत. बँकेवर या निवडणुकीचा सुमारे कोटी-दीड कोटी खर्चाचा बोजा पडणारच आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी व सहकार उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी (15 नोव्हेंबर) निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप केले. सहकार पॅनेलला कपबशी चिन्ह मिळाले असून, अन्य उमेदवारांना विविध चिन्हे मिळाली आहेत.
बँकेच्या 18 जागांसाठी येत्या 28 नोव्हेंबरला निवडणुकीचे मतदान होणार आहे. बँक आर्थिक अडचणीत असल्याने निवडणूक खर्चाचा बोजा नको म्हणून बँक बचाव पॅनेलने पहिल्यापासून बिनविरोधचा सूर लावला होता. सुरुवातीला प्रतिस्पर्धी असलेल्या व मागील 2014 ते 2019 या काळात सत्तेवर असताना रिझर्व्ह बँकेकडून बरखास्त झालेल्या संचालकांच्या समर्थकांच्या सहकार पॅनेलने बँक बचावच्या बिनविरोध सुरात सूर मिसळला. पण नंतर राजकीय धोबीपछाड देत कमी जागांवर बोळवण करण्याची तयारी दाखवली. त्यातही बँक बचावचे प्रमुख राजेंद्र गांधी, दीप चव्हाण व अन्य काहीजण त्यांना नको होते तर अ‍ॅड. अभय आगरकर, सदा देवगावकर यांच्यासह अन्य काहींची पक्षीय राजकीय दबावाने लढण्याची तयारी नव्हती. त्यामुळे अचानक बँकफूटवर जावे लागलेल्या बँक बचाव पॅनेलने मग आत्मघातकी निर्णय घेत आपले सारेच अर्ज काढून घेऊन एकतर्फी सहकार पॅनेलचा सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. परिणामी, आता या निवडणुकीतील रंगत जवळपास संपल्यात जमा आहे.

सातजणांची होती उत्सुकता
बँकेच्या 18 जागांपैकी 4 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत व राहिलेल्या 14 जागांसाठी 21जण रिंगणात आहेत. यापैकी 14जण सहकार पॅनेलचे आहेत व 7जण अपक्ष आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या म्हणजे मागील शुक्रवारी (12 नोव्हेंबर) या सातही जणांनी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे यावर सोमवारी (15 नोव्हेंबर) निर्णय होऊन हे सातही अर्ज निकाली निघतील व राहिलेले सहकार पॅनेलचे 14जण बिनविरोध निवडल्याचे जाहीर होईल, अशी चर्चा होती. पण तसे काही झाले नाही. या सातही जणांचे माघारीचे अर्ज मुदतीनंतर आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून स्वीकारले गेले नाही व त्यांची उमेदवारी रिंगणात कायम राहिली. परिणामी, आता येत्या 28 नोव्हेंबरला सुमारे 56 हजार मतदारांच्या मतदानाचे नियोजन व त्याची प्रक्रिया आणि त्याची मतमोजणीचे दिव्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पार पाडावे लागणार आहे. पण बँक बचाव पॅनेलसारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने व आता रिंगणातून बाहेर पडल्यावर त्यांच्याकडून होणार्‍या टीकाटिपणी व आरोप-प्रत्यारोपांनाही फारसा अर्थ राहिला नसल्याने ही निवडणूक नीरस झाली आहे.

अशी असतील चिन्हे
नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक विभागाने उमेदवारांना कपबशी, टेबल, गॅसटाकी, बॅट, हॅट, पतंग, कपाट, किटली आदी चिन्ह दिली आहेत. सहकार पॅनलच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी 21 उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले आहे. चिन्ह व उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे- कपबशी- अजय बोरा, अनिल कोठारी, ईश्‍वर बोरा, गिरीश लाहोटी, दीप्ती सुवेंद्र गांधी, महेंद्र गंधे, राजेंद्रकुमार अग्रवाल, राहुल जामगांवकर, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा, कमलेश गांधी, अतुल कासट, अशोक कटारिया, सचिन देसर्डा (सर्व सहकार पॅनेल), हॅट- अनिल गट्टाणी, टेबल- दीपक गुंदेचा, बॅट- स्मिता महावीर पोखरणा, गॅसटाकी- संजय डापसे, किटली- गणेश राठी, कपाट- रज्जाक इनामदार, पतंग- रमणलाल भंडारी.

माघारीसाठी लोढा होते प्राधिकृत
निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेकांनी माघार घेतली व त्यांच्या माघारीच्या अर्जावर दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा यांची स्वाक्षरी आहे. तर, बँक बचावचे उमेदवार दीप चव्हाण यांनी आपण माघार घेतली नसल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी सांगितले की, बहुतांश उमेदवारांनी माघारीसाठी वसंत लोढा यांना प्राधिकृत केले होते. यासाठीच्या पत्रावरील उमेदवारांच्या सह्या व उमेदवारी अर्जावरील सह्या एकमेकांशी जुळत असल्याने हे माघारीचे अर्ज स्वीकारले गेले. मल्टीस्टेट कायदा व बँक उपविधीनुसार उमेदवार वा सूचकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीला माघारीसाठी प्राधिकृत करता येते. शिवाय माघार घेतलेले बरेच उमेदवार लोढांसमवेत आलेही होते. त्यामुळे त्यांचे अर्ज स्वीकारले. तसेच रिंगणात राहिलेल्या सातजणांचे माघारीचे अर्ज उशिरा आल्याने स्वीकारले नाहीत, असेही आहेर यांनी स्पष्ट केले.

COMMENTS