रायगड प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या सं
रायगड प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडले. इतकेच नाही तर, त्याची (राज्यपाल कोश्यारी) उचलबांगडी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, ते जर इथे असते तर त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले असते, असा संताप देखील उदयनराजेंनी बोलताना व्यक्त केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह उदयनराजेंनी भाजपलाही चांगलेच सुनावले आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याचे विकृतीकरण होत आहे. मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचे आहे. राज्यपालांना हटवलेच पाहिजे. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च पद आहे, राज्याचे सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावणार का? यासंदर्भात विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. आम्ही जे काय करायचे ते करतो. काळी फीत लावून वगैरे काही होत नाही.त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी. ते इथे जर असते, तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता, असे उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का? असा प्रश्न विचारताच उदयनराजे म्हणाले, त्यांचा तोल गेला असता. मी कशाला त्यांना हात लावतोय. मी त्यांना हात लावला, तर मला कमीपणा येईल, असे देखील उदयनराजे यांनी सांगितले.
आझाद मैदानावर धडकणार – राज्यपालांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उदयनराजेंनी शनिवारी रायगडावर शिवभक्तांशी संवाद साधला असून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लवकरच मुंबईतल्या आझाद मैदानावर जाऊ, आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ’, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.
COMMENTS