मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत, तब्बल दोन तास चर्चा केल्यामुळ
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत, तब्बल दोन तास चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ही शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे कौतुक करणारे पत्र त्यांना पाठवले होते. या पत्रामध्ये पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असते त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन, अशा शब्दांत फडणवीसांचे अभिनंदन केले होते. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. तब्बल दीड वर्षांनंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे सर्व आमदार भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या पाठिशी उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे नेमके कुणाला मतदान करणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, राजू पाटील यांनी भाजपाच्याच उमेदवाराला आपलं मत दिलं. यामुळे देखील भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले. दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जात आहे.
COMMENTS