मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी निवडणूक प्रक्रियेतच एक अनोखी आणि चर्चेची परिस्थिती निर्माण झाली आहे

मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी निवडणूक प्रक्रियेतच एक अनोखी आणि चर्चेची परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर अनेक प्रभागांमध्ये स्पर्धाच उरलेली नसून, तब्बल 70 जागांवर उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आश्चर्य व्यक्त करत, ही निवडणूक अभूतपूर्व असल्याचे मत मांडले आहे.
ठाण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे तसेच माजी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध निकालांवर सविस्तर चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका जवळून पाहिल्या, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत, अशी निवडणूक माझ्या आयुष्यात प्रथमच पाहतो, असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी सांगितले. आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या 70 नगरसेवकांमध्ये महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे 44 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 22 जागांवर यश मिळवले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन, मालेगावमधील इस्लाम पार्टीचा एक आणि एक अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. राज्यात सर्वाधिक बिनविरोध निवडी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत झाल्याचे समोर आले आहे. येथे महायुतीचा प्रभाव ठळक असून, भाजपचे 15 आणि शिवसेना (शिंदे गट)चे 7 उमेदवार कोणत्याही लढतीशिवाय विजयी झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाआधीच अनेक प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.
लोकशाहीवर घाला? संजय राऊतांचा आरोप
बिनविरोध निवडींच्या वाढत्या संख्येवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे कोणत्या विकासकामांच्या जोरावर? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधार्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाही प्रक्रियेवर घाला असून, मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासोबतच राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील जनतेचा विश्वास ढासळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS