इस्रायलच्या हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थितीतेहरान : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती अधिक गंभीर होत असून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू

इस्रायलच्या हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती
तेहरान : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती अधिक गंभीर होत असून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्षाचा रविवारी नववा दिवस होता. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणमधील तेल साठवणूक केंद्रे आणि इंधन साठ्यांवर लक्ष्य साधत हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे तीस इंधन टाक्या आणि तीन महत्त्वाचे तेल साठे उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यांनंतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली असून, या इंधन साठ्याचा भडका उडाला आहे.
इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना इराणने मध्यपूर्वेतील काही देशांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. इस्रायलसह कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती या पाच देशांतील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र आणि मानवरहित यंत्रांच्या मदतीने हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या इस्लामिक क्रांती रक्षक दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, देश दीर्घकाळ युद्ध लढण्यास सक्षम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन आणि इस्रायली लष्करी तळांसह या प्रदेशातील दोनशेहून अधिक ठिकाणे संभाव्य लक्ष्य म्हणून ओळखण्यात आली आहेत. संघर्ष सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ चालू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. इराणमधील मदत संस्थांच्या माहितीनुसार, संघर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हजारो नागरी भागांना हल्ल्यांचा फटका बसला आहे. अनेक घरांचे, दुकाने आणि सार्वजनिक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही वैद्यकीय केंद्रे आणि शाळांनाही या हल्ल्यांचा फटका बसल्याचे सांगितले जाते. युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलमध्येही शेकडो नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदत व बचाव संस्थांची केंद्रेही काही ठिकाणी नुकसानग्रस्त झाली आहेत. दरम्यान, इराकमध्ये कार्यरत असलेल्या इराण समर्थित सशस्त्र गटाने अमेरिकन लष्करी तळांवर एका दिवसात अनेक हल्ले केल्याचा दावा केला आहे. या कारवायांमध्ये क्षेपणास्त्रे आणि मानवरहित यंत्रांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या गटाच्या म्हणण्यानुसार, मध्यपूर्वेतील अमेरिकन उपस्थितीला प्रत्युत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या अनेक कारवायांची जबाबदारी या संघटनेने स्वीकारली आहे.

COMMENTS