मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : विरोधी पक्ष नेते दरेकर यांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : विरोधी पक्ष नेते दरेकर यांची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयात झालेल्या जळीतकांडाबाबत आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी आहे, पण ते जर हात झटकत असतील, तर राज्याचे आरोग्य मंत्र

खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा
ध्वजारोहणास विरोध करणार्‍या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयात झालेल्या जळीतकांडाबाबत आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी आहे, पण ते जर हात झटकत असतील, तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, नगर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित केले असले तरी वास्तविक पाहता ते या घटनेला जबाबदार आहेत, म्हणून अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे व या सर्व प्रकरणाचा सीआयडीकडूनही तपास केला जावा, अशीही मागणी यावेळी दरेकर यांनी केली. या प्रकरणासंदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते दरेकर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जळीतकांड घडलेल्या आयसीयु कक्षाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तारकपूर एसटी स्टँड जवळ सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, बाबासाहेब सानप, अ‍ॅड. विवेक नाईक, दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दरेकर म्हणाले, नगर जिल्हा रुग्णालयामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना आहे. वास्तविक पाहता सरकारने फायर ऑडीट करा व सर्व ठिकाणी फायर प्रतिबंधक यंत्रणा बसवा, अशा सूचना देऊन देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. पण, दुसरीकडे असंतोष कमी करण्यासाठी कुणावर तरी कारवाई केली गेली व विनाकारण या ठिकाणी कार्यरत असलेल्या परिचारिका तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ते मदत करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ही बाब गंभीर आहे. इमारत पूर्णत्वाला गेली नसेल अशा ठिकाणी रुग्णालय असो किंवा इतर कोणतीही सुविधा असो, ते सुरू केले नाही पाहिजे. मात्र, नगर येथे कसे सुरू झाले या प्रकरणाचा सुद्धा आता शोध घेतला पाहिजे, शिवाय शासकीय इमारतींना महापालिकेचा पूर्णत्व दाखलाही गरजेचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

337 रुग्णालये प्रतीक्षेत
भंडार्‍याच्या घटनेनंतर सरकारने सर्वत्र फायर यंत्रणा करावे असे निर्देश दिले होते. अशी 337 रुग्णालये आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी नाही. ही यंत्रणा झाली असती तर किमान 100च्यावर मृत्यू रोखता आले असते, असा दावा करून ते म्हणाले, एकीकडे कर्मचार्‍यांचे बळी देतात दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा विद्युत अभियंता किंवा तत्सम यंत्रणेला का दोषी धरले नाही, असा सवाल करून ते म्हणाले, सरकारचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झालेले आहे, फक्त घोषणा करायच्या आणि मोकळे व्हायचे असा सरकारचा सध्याचा उद्योग सुरू आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला. नगरच्या या सर्व प्रकरणात सरकार व प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे अगोदर ज्या विभागाचे हे काम होते, त्या राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर खर्‍या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले. एकीकडे परिचारिकांवर कारवाई केली जाते, मात्र दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक आहे त्यांच्यावर मात्र फक्त निलंबनाची कारवाई होते हे कसे काय? त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अगोदर गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही दरेकर यांनी सांगितले.

पवार, आधी रुग्णालय सुरू करा
आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारने व्हेंटिलेटर जे दिले आहे, ते निकृष्ट आहेत व त्याच्यातून हा प्रकार घडला, असा आरोप केला यावर विचारले असता दरेकर म्हणाले की, फक्त त्यांना आरोप करायचे एवढेच माहीत आहे. अगोदर त्यांनी या ठिकाणचा दवाखाना पुन्हा सुरू करून दाखवावा, असे आव्हान देऊन ते म्हणाले, एवढी घटना होऊन देखील सुद्धा जिल्हा रुग्णालयांमध्ये कोणत्याही वैद्यकीय सुविधा पुन्हा सुरू झालेल्या नाहीत, येथे आयसीयु सेंटरसुद्धा सुरू झालेले नाही. आता ते दोन दिवसात सुरू करण्याची ग्वाही मला प्रशासनाने दिली आहे, असे ते म्हणाले.

शरद पवारांनी शब्द पाळावा
राज्यामध्ये सध्या एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन पाच दिवसापासून सुरू आहे, सरकार लक्ष द्यायला तयार नाही. अगोदर नोटिसा पाठवून त्यानंतर कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याची कारवाई सरकारने केली आहे. एक प्रकारे दहशत करण्याचा प्रकार सरकारचा सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे आंदोलन भाजपाने अधिक वाढवले या आरोपावर ते म्हणाले, उपोषण करणारे लहान नाहीत. त्यांना आपल्या जबाबदार्‍या समजतात, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. तुम्ही आम्हाला श्रेय देऊ नका मात्र त्या कर्मचार्‍यांचे प्रश्‍न तात्काळ सोडवा, अशी आमची भूमिका आहे. देशाचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूरला एसटी अधिवेशनात कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घेण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे त्यांनी, मुख्यमंत्री ठाकरे व मंत्री अनिल परब यांनी एकत्रितपणे बसून हा विषय मार्गी लावला तर मी ठाकरेंच्या पाया पडेल व परब यांना मोठा हाल घालीन, असेही ते म्हणाले.

विचारल्यावर ते फक्त हसले..
नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये फायर यंत्रणा बसवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून अडीच कोटी रुपये मंजूर केले असले तरी तो निधी उपलब्ध नाही. शिवाय, यासंदर्भातील फाईलवर सहीही झालेली नाही. ती सही का थांबली, असे विचारले असता, उपस्थित सारे अधिकारी हसले, असा दावा करून दरेकर म्हणाले, पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने फायलीवर सही करावी व सिव्हीलचा आयसीयु कक्षही तातडीने सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेनेने भूमिका बदलली
त्रिपुराच्या विषयावरून अमरावती येथे घडलेल्या घटनेमागे भाजपचा हात असल्याचे सरकारने सिद्ध करावे, असे आव्हान देऊन दरेकर म्हणाले, मुळात त्रिपुराच्या घटनेचे अमरावती येथे पडसाद उमटण्याचा काहीच संबंध नाही. पहिल्या दिवशी ज्यांनी हैदोस घातला, त्यांना वेगळा न्याय दिला, त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. दुसर्‍या दिवशी हिंदुत्वप्रेमी जनता रस्त्यावर आली तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा यांना विसर पडला. सत्तेसाठी शिवसेनेने भूमिका बदलली, असा टोला दरेकर यांनी लगावला. रझा अकादमीच्या मोमीनकड़ून पुष्पगुच्छ घेत असल्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोटोही आहे, मग आम्ही त्यांचा त्याच्याशी संबंध जोडायचा का, असा सवालही त्यांनी केला.

COMMENTS