Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिशक्ती अभियानाला गती ः मंत्री तटकरे

ग्रामपंचायतींच्या शंभर टक्के सहभागावर भरमुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘आदिशक्ती अभियान’ाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, यास

भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली मी इलायची दिली – शंभुराज देसाई
विदर्भातील अनेक गावांना पावसाचा तडाखा
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजूरी

ग्रामपंचायतींच्या शंभर टक्के सहभागावर भर
मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘आदिशक्ती अभियान’ाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकार्‍यांना ठोस सूचना केल्या.
या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी कैलास पगारे, राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, सहसचिव विलास ठाकूर आणि उपसचिव आनंद भोंडवे उपस्थित होते. उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात सादरीकरण केले. तसेच राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. मंत्री तटकरे यांनी महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला. ‘आदिशक्ती अभियान’ाचा उद्देश महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, त्यांची सुरक्षितता आणि स्वावलंबन वाढविणे, आत्मविश्‍वास दृढ करणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानामुळे महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग अधिक मजबूत होणार असून ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ठरविण्यात आलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासोबतच अंमलबजावणीदरम्यान येणार्‍या अडचणी आणि प्रलंबित बाबींवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. अभियान अधिक प्रभावी ठरावे यासाठी प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

COMMENTS