नांदेड प्रतिनिधी - जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठी आपल्याला जर
नांदेड प्रतिनिधी – जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठी आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही. हवामान तज्ञांनी अलनिनो व इतर घटकामुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण कमी अशी स्थिती दर्शविली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समिती, खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता बा. क. शेटे, कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रविण साले, व इतर विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या पंपहाऊस मधील पंपांची स्थिती व त्यामुळे पाणी पुरवठ्यावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा परिणाम याबद्दल पालकमंत्री महाजन यांनी काळजी व्यक्त केली. पंपांची दुरूस्ती, याबाबत जलसंपदा विभागाने केलेली कार्यवाही, तांत्रिक समितीसाठी सादर केलेला प्रस्ताव याची इत्यंभूत माहिती घेऊन मंत्रालयीन पातळीवर हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याबाबत पालकमंत्री महाजन यांचे लक्ष वेधले होते. बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकर्यांची फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या खरीप हंगामाचे नियोजन करतांना प्रशासकीय पातळीवर शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. तथापि शेतकर्यांनीही पुरेशा पाऊस जोपर्यंत होत नाही तो पर्यंत पेरणीच्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कृषि तज्ज्ञ आणि कृषि विभाग वेळोवेळी ज्या काही सूचना देतील त्याचे पालन करून खरीप हंगामाचे नियोजन शेतकर्यांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बर्याच ठिकाणी शेतकर्यांना चांगल्या बियाण्यांच्या नावाखाली चुकीचे, उगवण क्षमता कमी असलेले बियाणे दिली जातात. यात शेतकर्यांची होणारी फसवणूक ही मोठ्या आर्थीक हानीची होऊ शकते. यासाठी कृषि विभागाने बियाणे विक्री होत असतांना बाजारपेठांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाला दिले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी खरीप हंगाम 2023 साठी कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. यामध्ये जिल्ह्यात खरीप प्रस्तावित 7.74 हेक्टर क्षेत्र आहे. नांदेड जिल्हा पर्ज्यन्यमानची तालुकानिहाय माहिती, सन 2023 मधील प्रस्तावित पिकवार क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता,अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानापोटी बाधित शेतकर्यांना मदत वाटप, पिकनिहाय बियाणे गरज व मागणी, खताची मागणी व पुरवठा खरीप हंगाम 2023 ची आकडेवारी याबाबत तपशील पीपीटीद्वारे सादर केला. जिल्ह्यात खरीप ज्वारीची गतवर्षी 18 हजार 959 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मका पिकाची गतवर्षी 537 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तूर यावर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्र, मुग 27 हजार हेक्टर क्षेत्र, उडीद 27 हजार हेक्टर क्षेत्र, सोयाबीन 4 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र, कापूस 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र असे एकुण 7 लाख 74 हजार 519 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यासमवेत ऊस 32 हजार हेक्टर क्षेत्र, हळद 20 हजार हेक्टर, केळी 6 हजार हेक्टर, इतर भाजीपाला व फळपिके 6 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून 2023 मध्ये हे एकुण क्षेत्र 8 लाख 38 हजार 519 हेक्टर एवढे राहिल. यावर्षी सर्वाधिक प्रस्तावित क्षेत्र हे सोयाबीनचे असून याची टक्केवारी 126.63 एवढी आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारुप आढावा
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकमंत्री महाजन यांना दिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकत्याच झालेल्या विविध कार्यक्रमांचे प्रारुप सादर करून त्यास बैठकीत मान्यता घेतली. समितीतर्फे प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत पालकमंत्री महाजन यांना देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अनेक महत्त्वपूर्ण स्थळ आहेत. यात उमरी येथील ऐतिहासिक स्थळाचे शुशोभिकरण व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी निधीची तरतुद होण्याची मागणी आमदार राजेश पवार यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे केली.
COMMENTS