मुंबई ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवल समुद्र किनारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झ
मुंबई ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवल समुद्र किनारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून, बुधवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. आम्ही येत्या रविवारी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील हुतात्मा स्मारकापासून तर गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. मालवण मध्ये जे घडले तसे आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते. शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रामध्ये कोसळला आहे. त्यामुळे महाफुटीच्या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यांचा कारभार किळसवाणा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र न्यायालयाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील बंदी आणली गेली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्याही मध्ये मोदी, शहांचे दलाल रस्ता अडवून बसले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मालवणमधील घटनेवरुन टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वार्यामुळे पडला हे कारण देणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठला असल्याचे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्ष विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. यावर शरद पवार म्हणाले, यात राजकारण काय आहे? शिवाजी महाराजांच्या काळामधील एक गोष्ट लोकांना भावली. त्यांच्या कार्यक्षेत्रात रांझ्याच्या पाटलाने एका भगिनीवर अत्याचार केले. ही तक्रार शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर त्यांनी त्याचे दोन हात कलम केले होते. या प्रकरणांमध्ये महाराजांची नीती काय हे त्यांनी समोर ठेवले. एका भगिनीला त्रास दिल्यावर सक्त निर्णय त्यांनी घेतला. आज तसा निर्णय घेणार्या राजाची प्रतिकृती समुद्रावर ज्यावेळी तयार करुन आणली गेली. ती तयार करताना जो भ्रष्टाचार केला गेला त्यामुळे आज ती मूर्ती उध्वस्त झाल्यासारखी दिसते. आज या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नसल्याची टीका पवार यांनी केली.
सरकारच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला : शरद पवार – कुठे भ्रष्टाचार करायचा याचे तारतम्य सरकारमध्ये नसल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार म्हणाले, आज कोणी म्हणतंय वार्याचा वेग होता. भ्रष्टाचार केला. त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचं तारतम्यही यांना नाही. त्यामुळे लोकांची तीव्र भावना आहे. त्यासाठीच आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असे त्यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी एकमेकांना दोषी ठरवणे सुरू आहे. यावर शरद पवार म्हणाले, पुतळ्याची जवाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. ते नाकारू शकत नाही. राज्यात कुठेही आणि कुणाचाही पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, असेेही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
COMMENTS