रायमोहा : सत्तेत असो अथवा नसो मराठवाड्याच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ

रायमोहा : सत्तेत असो अथवा नसो मराठवाड्याच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथे भेट झाली होती. यावेळी मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा करून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी ठोस भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली असल्याची माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रायमोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार कार्यक्रम प्रसंगी दिली आहे.
असद सेवाभावी संस्था रायमोहा यांच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजक अब्दुल जब्बार खान पठाण, अमानुल्ला खान पठाण, उमरखान पठाण, सुलेमान खान पठाण यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विलास बडगे, दिनकर कदम, सुधाकर मिसाळ, जालिंदर सानप, दादासाहेब मुंडे, भागवत तावरे, सुभाष क्षीरसागर, मदन जाधव, नारायण परजणे, सखाराम मस्के, संजय सानप आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गेल्या 23 वर्षापासून रायमोहा येथे सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून पठाण कुटुंबीयांच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केला जातो. हा सामाजिक सलोखा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामाजिक एकता निर्माण करून समाजात विखुरलेल्या मनाला एकत्र करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक अडचणी आहेत पण अंधारात दिवा लावण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. माझ्या राजकीय जीवनात सर्वधर्मसमभावाला प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची भेट झाली तेव्हा मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न आपण मांडला आहे समुद्राला वाहून जाणारे पाणी आम्ही मागत आहोत. जायकवाडीचा प्रकल्प हा 102 टीएमसीचा आहे मात्र यामध्ये 23 टीएमसी गाळ आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्पातून 150 टीएमसी पाणी वाया गेले आहे. हे पाणी जर थांबवण्याची प्रक्रिया झाली तर मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळू शकते. सत्ताधारी लोकांनी ही मागणी आग्रहाने मांडायला हवी होती परंतु असे काहीही होताना दिसत नाही. दीर्घकालीन कामाचे नियोजन आणि व्हिजन समोर ठेवून कामे केली पाहिजेत. अडचणी येत असतात स्पीड ब्रेकर येत असतात पण त्यातून पूर्ण ताकतीने उभे राहून पुढे जायचे असते. रमजान महिना हा स्वतः आत्मचिंतन करून गोरगरिबांची सेवा करण्याचा आहे. जातीच्या नावावर सध्या ओळख निर्माण होऊ लागली आहे, हे मोठे दुर्दैव आहे. निवडणुका आल्या की जातीचे राजकारण केले जात असून त्यानंतर मात्र सगळे विसरून स्वतःच्या दुकाना चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे समाजात प्रत्येकाची मने कलुषित होऊ लागली आहेत. समाज विखुरला जात आहे हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी वसंत काटे, अजिनाथ गवळी, भारत बहीर, महादेव बहीर, नितीन जायभाये, सुधाकर जाधव, सखाराम जाधव, गोकुळ सानप, निजामोद्दीन तांबोळी, प्रभाकर सानप, नवनाथ सानप, भरत जाधव, गुलजार पठाण, प्रकाश इंगळे, गहिनीनाथ पाखरे, ऋषिकेश राऊत, अशोक गवळी, हनुमान सांगळे यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

COMMENTS