Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ

कर्नाटकात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न पडू लागले असून, त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

पंतजलीचा दावा आणि भूल
अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे
दुबार पेरणीचे संकट

कर्नाटकात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न पडू लागले असून, त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र महाविकास आघाडीचे घोडे जागावाटपावर अडून बसल्याचे दिसून येत आहे. आगामी काही महिन्यांनी लोकसभा निवडणुकीचे चौखुर उधळलेले असतील, त्यावेळी आपण तयारीत राहिलेले बरे, आणि उमेदवार ठरले म्हणजे त्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादिशेने महाविकास आघाडीने आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. मात्र आघाडी घेण्याच्या नादात महाविकास आघाडीतील बिघाडी समोर येतांना दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांचा विचार करता, सर्वाधिक खासदार भाजप आणि त्यापाठोपाठ 19 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आता आघाडीत सहभागी असून, यातील 13 खासदार शिंदे गटासोबत बाहेर पडत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्या 19 जागा निवडून आल्यामुळे आम्ही 19 जागा लढवणार असा ठाकरे गटाचा होरा आहे, तशीच रणनीती ठाकरे गट आखतांना दिसून येत आहे. मात्र यात राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी घेत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सत्ता मिळवल्यामुळे काँगे्रसचा आत्मविश्‍वास वाढला असून, ते देखील जागा वाढवून मागण्याची शक्यता आहे. अशावेळी ठाकरे गटाला आपल्या काही जागा कमी करून, त्या आपल्या सहयोगी पक्षाला द्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील आगामी गणिते बघता ऐन लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर काँगे्रस किंवा राष्ट्रवादी काँगे्रसला मोठा फटका बसू शकतो. या पक्षातील काही ज्येष्ठ नेते भाजपमध्ये डेरेदाखल होवू शकतात, त्यादृष्टीने भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. असे झाल्यास या पक्षाची ताकद कमी होवू शकते. ती ताकद भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी आपल्या जागा कमी करून मित्रपक्षाला देवू शकतात. त्यामुळे वंचित गटाला दोन-तीन अणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाला 1 जागा सोडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीला एकत्र आणि ताकदीने लढता येईल. लोकसभा निवडणूक आघाडीने एकत्र लढल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसणार यात शंका नाही. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील वातावरण देखील बिघण्याची शक्यता आहे. कारण राज्यात अशावेळी ईडी, सीबीआय सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास एकतर इतर पक्षामध्ये बंडखोरी होवून ते नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, किंवा तुरुंगात तरी असतील. एकदंरित या रणधुमाळीत बर्‍याच राजकीय उलथापालथी बघण्यास मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आजजरी जागावाटपांचा खेळ सुरू असला तरी, यातून तोडगा निघू शकतो. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तीनही घटक पक्षांचे 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. याचबरोबर वंचितचे बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर मुंबई दक्षिण मध्यमधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याठिकाणी वंचित आणि ठाकरे गटाची मोठी ताकद असल्यामुळे त्यांचा विजय सहज होेवू शकतो. तर दुसरीकडे सोलापूरच्या जागेवर काँगे्रसने दावा केला आहे, तर दुसरीकडे या जागेवर राष्ट्रवादीचा देखील डोळा असल्यामुळे या जागेवर मतभेद होवू शकतात. या जागेवर प्रणिती शिंदेंना लोकसभेवर पाठवण्याच्या हालचाली असून, ही जागा काँगे्रसला सुटल्यास शिंदे ही जागा लढवतील. या जरी सर्व शक्यता असल्या तरी, त्यादृष्टीने आघाडीची रणनीती आखण्यास सुरू आहे, मात्र पुलाखालून अजून बरेच पाणी जावू द्यावे लागणार आहे, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर काही नेते भाजपमध्ये आणि काही नेते तुरुंगात गेल्यास नवल वाटायला नको. तूर्तास इतकेच. 

COMMENTS