Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !

महाराष्ट्र राज्यात काही वर्षांपूर्वी असलेली दाऊद, छोटा राजन यासारख्या कुख्यात गुंडांची दहशत मोडून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. त्यामुळे मु

…गिरणी कामगारांच्या दिशेने
बेजबाबदारपणाचे बळी !
राजकारण-भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा

महाराष्ट्र राज्यात काही वर्षांपूर्वी असलेली दाऊद, छोटा राजन यासारख्या कुख्यात गुंडांची दहशत मोडून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. त्यामुळे मुंबईतील ही गुन्हेगारी मोडीत काढल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राचा वेगाने विकास होत असतांनाच मुंबईला पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे. हा घट्ट इतका वेगाने वाढतांना दिसून येत आहे, की यातून महाराष्ट्राचे मोठे नुकसान होण्याचा धोका देखील दिसून येत आहे. दिवसाढवळ्या होणार्‍या हत्या यासोबतच महाराष्ट्राला ड्रग्जचा देखील मोठा विळखा दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वी अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉरेन्स बिष्णोईचे नाव समोर आले होते. त्यानंतर ऐन दसर्‍याच्या दिवशीच सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेत वाढ होतांना दिसून येत आहे. पुण्यात काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात दिवसा-ढवळ्या गँगवार होत असतांना देखील पोलिस गुन्हेगारी मोडून काढण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची आणि राज्य सरकारची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र अशावेळी राज्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात येत आहे. आणि त्याचे कोणतेही सोयरसुतक राज्यकर्त्यांना नाही. वास्तविक पाहता राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणूक होत आहे. अशावेळी या निवडणुका या भयमुक्त वातावरणात होण्याची गरज असतांना एकीकडे दहशत निर्माण करण्यात येत आहे. वास्तविक पाहता बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात बिष्णोई गँगला कोणता फायदा होणार आहे? त्यामुळे त्यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाली की राजकीय वादातून याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. खरंतर ज्या तिघांनी गोळ्या झाडल्या त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र ते दोघे मुख्य सूत्रधार नाहीत, याची एव्हाना पोलिसांना देखील जाणीव नाही. त्यामुळे त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध पोलिसांनी घेण्याची खरी गरज आहे. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली असल्याचे देखील समोर आले आहे. अशावेळी त्यांचे सुरक्षा काय करत होती? याचे उत्तर देखील शोधण्याची खरी गरज आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील गुन्हेगारी वेगळ्याच वळणावर जातांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता या गुन्हेगारीला राजकीय संरक्षण प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला पोलिसांना आवर घालण्यासाठी विलंब लागत असल्याचे दिसून येत आहे. राजकारणातील गुन्हेगारांचा वावर हा वारंवार चिंतेचा विषय म्हणून समोर येतो. पैशाचा वापर, जाती-धर्मांचा आधार जितका विपरीत परिणाम राजव्यवस्थेवर करतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेगारांचा राजकारणातील शिरकाव गंभीर आहे. त्यातच पुणे आणि मुंबईमध्ये ड्रग्जचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. पुणे शहरात मध्यमवर्गीय तरूण मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत असतात, मात्र या मध्यमवर्गीय तरूण देखील या ड्रग्जच्या विळख्यात जातांना दिसून येत आहे. त्यातच या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर राजकीय बळ मिळत असल्यामुळे या गुन्हेगारी आटोक्यात येतांना दिसून येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी या गुन्हेगाराला आश्रय देण्याचे बंद करण्याची गरज आहे. तरच ही गुन्हेगारी कमी होईल. त्यातच पोलिसांनी गँगवार मोडीत काढण्याची खरी गरज आहे.

COMMENTS