राहाता : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन कर

राहाता : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढत्या महागाईचा व गॅस दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, कामगार तसेच महिला वर्गावर या महागाईचा मोठा आर्थिक बोजा पडत असून केंद्र सरकारने यावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे घरगुती अर्थकारण कोलमडल्याचे नमूद करण्यात आले. तसेच गॅस ऑनलाइन बुकिंग करताना ओटीपी वेळेत न मिळणे, बुकिंग प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येणे तसेच बुकिंग करूनही गॅस वेळेत उपलब्ध न होणे अशा समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे जनतेवर अन्याय होत असून सरकारने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, सचिन चौगुले, नगरसेवक शशिकांत लोळगे, उत्तमराव घोरपडे, नीलमसोळंकी, रणजीत बोठे, गणेश सोमवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात सुधीर म्हस्के, अनिल बोठे, उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, राजेंद्र अग्रवाल, पुंडलिक बावके, अमोल गायके,सदाशिव गाडेकर, मुन्ना फिटर, जयसिंग सातव,शिवप्रसाद आहेर सह महिला प्रतिनिधी लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्या आशा आहेर, सुनीता कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS