Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निष्ठा, समर्पण आणि कार्य वेशीवर टांगले; आयाराम-गयारामांचे महानगरपालिका निवडणुकीचे संधीसाधू राजकारण

नांदेड । प्रतिनिधी नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाचे सगळे जुने नियम, तत्वज्ञान आणि नीतीमूल्ये जणू नगरपालिकेच्या वेशीवर टांगून ठेवण

नांदेड विकासाच्या दिशेने भाजपचा ठाम संकल्प
नागरी उपेक्षेचा कडेलोट : सोमेश कॉलनीत मतदान बहिष्काराचा इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाचे सगळे जुने नियम, तत्वज्ञान आणि नीतीमूल्ये जणू नगरपालिकेच्या वेशीवर टांगून ठेवण्यात आली आहेत. निष्ठा, समर्पण आणि कार्य हे शब्द आजच्या राजकीय व्यवहारात केवळ भाषणापुरते उरले असून प्रत्यक्ष मैदानात मात्र आयाराम-गयाराम संस्कृतीने जोरदार एंट्री घेतली आहे. सर्वच पक्षांकडून सिझनल कार्यकर्ते आणि नेते मोठ्या अभिमानाने सामावून घेतले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कालपर्यंत ज्या नेत्यांनी एका पक्षाच्या झेंड्याखाली उभे राहून दुसर्‍या पक्षावर तोंडसुख घेतले, तेच नेते आज नव्या पक्षात प्रवेश करताना आम्ही सुरुवातीपासूनच या विचारांचे होतो असे ठासून सांगत आहेत. पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावर विचारधारा बदलते, भूमिका बदलतात, घोषवाक्ये बदलतात; मात्र बदलत नाही ती फक्त संधी साधण्याची मानसिकता. एका पक्षातून दुसर्‍या पक्षात कोलांट्या उड्या मारून जे काही मिळेल-तिकीट, पद, प्रतिष्ठा किंवा पुढील पाच वर्षांची सोय-त्यावर समाधान मानणारी ही राजकारणी मंडळी सध्या नांदेडच्या राजकीय रंगमंचावर प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, कालपर्यंत ज्यांना परके, बंडखोर, अविश्वासू अशी बिरुदे लावली जात होती, त्यांनाच आज हार घालून, फोटोसेशन करून पक्षात प्रवेश दिला जात आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा तपासण्याचे निकष आता इतिहासजमा झाले असून, जिंकण्याची क्षमता हाच एकमेव मापदंड उरल्याचे दिसते. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणारे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र कोपर्‍यात उभे राहून टाळ्या वाजवण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. राजकीय पक्षांची अवस्था इतकी झाली आहे की, निवडणूक जवळ आली की विचारधारेची गोदामे उघडली जातात आणि कोण उपलब्ध आहे? याचा शोध सुरू होतो. मग तो काल काँग्रेसचा, आज भाजपाचा, उद्या राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा असो-फक्त उपयुक्त असावा, एवढीच अट. त्यामुळे मतदारांनाही प्रश्न पडतो की, मग पक्ष वेगळे कशासाठी? विचार वेगळे कशासाठी? या आयाराम-गयारामांच्या राजकारणात सर्वाधिक फटका बसतो तो सामान्य मतदार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना. मतदार गोंधळात पडतो-काल ज्यांच्यावर टीका केली, आज त्यांनाच मत कसे द्यायचे? तर कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो-आपली निष्ठा, परिश्रम आणि संघर्ष यांची किंमत तरी काय? नांदेड महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, आज ती संधीसाधू राजकारणाचा जिवंत प्रयोग ठरली आहे. या प्रयोगात निष्ठा, समर्पण आणि कार्य हे शब्द फक्त घोषणांपुरते उरले असून, प्रत्यक्षात मात्र आयाराम-गयारामांचेच फावले आहे. शेवटी प्रश्न एकच उरतो-या सगळ्यात खरंच जिंकतो कोण? आणि हरतो कोण?

COMMENTS