Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग !

जागतिक युद्धाचे परिणाम आत्ता स्वयंपाकघरात देखील जाणवत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य मोजताना महागाई हा सर्वात संवेदनशील न

दुबईकडे जाणारी एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द
इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ला
गुजरातमध्ये एलपीजी गॅसचे ‘नंदा देवी’ जहाज दाखल
The current image has no alternative text. The file name is: Agralekh.jpeg


जागतिक युद्धाचे परिणाम आत्ता स्वयंपाकघरात देखील जाणवत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य मोजताना महागाई हा सर्वात संवेदनशील निर्देशक मानला जातो. कारण तो थेट सामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी जोडलेला असतो. सध्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार घाऊक महागाई दर फेब्रुवारीमध्ये 2.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. वर्षभरातील हा उच्चांक आहे. आकड्यांच्या या खेळामागे लपलेली खरी गोष्ट मात्र अधिक गंभीर आहे-महागाई पुन्हा डोके वर काढत आहे आणि त्याचा फटका थेट जनतेच्या स्वयंपाकघराला बसत आहे.
महागाईचा हा भडका केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही. तो बाजारात, भाजीपाल्याच्या टोपलीत, तेलाच्या डब्यात आणि दैनंदिन खर्चाच्या वहीत स्पष्ट दिसतो आहे. जानेवारीत 1.81 टक्के असलेला घाऊक महागाई दर एका महिन्यात 2.13 टक्क्यांवर पोहोचणे ही साधी चढ-उताराची बाब नाही. हा वाढता कल धोक्याची घंटा आहे. विशेषतः अन्नधान्य आणि प्राथमिक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर ठरते. अन्नवस्तूंच्या किमतीत झालेली वाढ ही सर्वात चिंताजनक बाब आहे. कारण अन्न हे प्रत्येकाच्या जगण्याचे मूलभूत साधन आहे. जेव्हा गहू, धान्य, भाज्या आणि खाद्यतेल महाग होते, तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर होतो. जानेवारीत घट दर्शवणारा अन्नमहागाई दर फेब्रुवारीत वाढून 1.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ केवळ आकड्यांमध्ये नाही, तर प्रत्येक घराच्या खर्चात वाढ झाल्याचे वास्तव आहे. याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये झालेली झपाट्याने वाढ. काही दिवसांतच प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी दर वाढणे हे सामान्य नाही. पाम तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल-सर्वच प्रकार महागले आहेत. स्वयंपाकघरातील हा मुख्य घटक महागल्याने प्रत्येक जेवणाचा खर्च वाढला आहे. त्यातच डालडा, सुगंधी तेल आणि इतर पूरक वस्तूंचे दरही वाढले आहेत. परिणामी, सणासुदीच्या काळात घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महागाईमागील कारणे केवळ देशांतर्गत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव त्यामागे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा तणाव दीर्घकाळ टिकला, तर तेलाचे दर प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. त्याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशावर होणार आहे. पेट्रोल-डिझेल महागले की वाहतूक खर्च वाढतो, आणि त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किमतीवर होतो-ही साखळी आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. मात्र, प्रश्‍न केवळ जागतिक परिस्थितीचा नाही. देशांतर्गत धोरणांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. पुरवठा साखळीतील अडथळे, साठेबाजी, आयात व्यवस्थापनातील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव यामुळे महागाईला अधिक खतपाणी मिळते. बंदरांवर अडथळे निर्माण होणे, बाहेरील राज्यांतून आवक कमी होणे आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी-या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे बाजारात दरवाढ. सर्वात मोठा प्रश्‍न असा आहे की, या वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काय करत आहे? केवळ आकडे जाहीर करून जबाबदारी संपत नाही. बाजारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करणे, साठेबाजांवर कारवाई करणे, आयात सुलभ करणे आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा वाढवणे-ही उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे. अन्यथा, महागाईचा हा भडका आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. किरकोळ महागाई देखील 3.21 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करते. म्हणजेच, घाऊक आणि किरकोळ दोन्ही पातळ्यांवर महागाई वाढत आहे. ही दुहेरी कात्री सामान्य नागरिकांना कापत आहे. उत्पन्न वाढत नसताना खर्च वाढत आहे, ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर आर्थिक असमतोल वाढण्याचा धोका आहे.
या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे महाग होतांना दिसून येत आहे. त्यामुळे सण-उत्सव साजरे करतांना मर्यादा येणार हे नक्की. अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपला आहे, अशावेळी सामान्य कुटुंबांना सण साजरे करताना खर्चाचा विचार करावा लागणे, ही अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. महागाई ही केवळ आर्थिक समस्या नाही, ती सामाजिक आणि राजकीय समस्या देखील आहे. ती लोकांच्या असंतोषाला खतपाणी घालते. त्यामुळे सरकारने याकडे केवळ आकड्यांच्या चष्म्यातून न पाहता, जनतेच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.आज गरज आहे ती ठोस आणि प्रभावी हस्तक्षेपाची. अन्यथा, महागाईचा हा भडका केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो संपूर्ण अर्थव्यवस्थेला भाजून काढू शकतो. जनतेचा संयम हा अमर्याद नसतो-आणि महागाई हा त्याच्या सहनशीलतेचा सर्वात मोठा कस पाहणारा घटक आहे. इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे केवळ इंधन टंचाईचाच नव्हे तर, सर्वसामान्यांच्या जगण्याचा भडका उडतांना दिसून येत आहे. त्यामुळे युद्ध लवकर संपवावे अशी सर्वसामान्यांची इच्छा असली तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वच जनतेचा वेठीस धरतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे इराणकडे जगाची रशियाचा अपवाद वगळता इतर देशांची कोंडी करण्याची ताकद आहे. त्यामुळे आणखी काही दिवस युद्धाचा भडका सुरूच राहिला तर, सर्वसामान्यांचे मात्र प्रचंड हाल होतील, यात कोणतीही शंका नाही.

COMMENTS